मुंबई CM Eknath Shinde on Sanjay Raut:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामाचा आढावा घेत पाहणी केली. यावेळी त्यांनी मुंबईतील पाच मोठ्या नाल्यांची पाहणी केली. पावसाळ्यात मुंबईतील हिंदमाता, दादर, सायन, मिलन सबवे आदी भागात पाणी साचतं. तिथं पाणी साचू नये, यासाठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. समुद्राला जेव्हा भरती येते, तेव्हा पाणी वस्त्यामध्ये घुसतं. असं पाणी भूमिगत टाक्यांमध्ये सोडण्यात येईल, अशी यंत्रणा उभी करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नाले सफाईच्या पाहणीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
भूस्खलनवर विशेष लक्ष :नाल्यातील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्याच आमचा प्रयत्न आहे. तसंच पावसाळ्यात भूस्खलन होऊन मोठं नुकसान होतं. त्या क्षेत्रावर आमचं विशेष लक्ष असेल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यामुळं अशा ठिकाणी आम्ही खबरदारी घेऊन लोकांचे एमएमआरडीएच्या वसाहतीत स्थलांतर करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच भूस्खलन क्षेत्रातील लोकांची आम्ही काळजी घेणार असून त्यांना पक्या घरात ठेवलं जाणार असल्याचा दावा शिंदेंनी केलाय. यासाठी लोकांनीही आम्हाला सहकार्य केलं पाहिजं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
रेल्वेसोबत डीप क्लीन करणार :मागील वर्षीपासून जमिनीचा हाड बेस लागत नाही तोपर्यंत गाळ काढला पाहिजे, असं मी मनपा कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. कारण फक्त गाळ काढून उपयोग नाही, तर नाल्याच्या तळापर्यंत गाळ काढला पाहिजे. गाळ काठावर न टाकता त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आपण डीप क्लिनिंग रेल्वेसोबत करणार आहोत. रेल्वेच्या अखत्यारीतील असणारे नाले यांची साफसफाई, नाल्यातील गाळ देखील पालिका डीप क्लिनिंगच्या माध्यमातून काढण्याचा आमचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
रस्त्यावर पाणी साचणार नाही :पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू आहेत. मेट्रोची काम सुरू आहे. परंतु या कामामुळं कुठेही रस्त्यावर पाणी साचणार नाही. याची खबरदारी घेतली गेली आहे. पावसामुळं मुंबईकरांना त्रास होणार नाही, याबाबत पालिका अधिकारी, कर्मचारी यांना आदेश दिले आहेत. तसंच आगामी काळात मुंबईत सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येतील. ज्याच्यामुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होईल. हे सिमेंटचे रस्ते पुढील दोन ते तीन वर्षात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील. परंतु आता एमएमआरडीए, मेट्रो, मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे हे सर्व मिळून काम करत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.