छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Chhatrapati Sambhajinagar Crime News : चार दिवसांपूर्वी महानगरपालिकेनं शहरात अवैधरीत्या गर्भपात करणारं सेंटर उघड केलं. त्याचे धागेदोरे आता सिल्लोड मार्गे थेट जालना आणि बीड पर्यंत जाऊन पोहोचलेत. जानेवारी महिन्यात गेवराईमधून पोलिसांच्या छाप्यात धक्का देऊन पसार झालेला डॉ. सतीश गवारे हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व गर्भपाताचे डॉक्टर आणि एजंटच्या संपर्कात होता. संपूर्ण मराठवाड्यात आवश्यकतेनुसार गर्भलिंगनिदानासाठी जात होता. दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन गर्भलिंगनिदानासाठी 55 हजार रुपये, तर स्थानिक पातळीवर 30 ते 40 हजार रुपये दर आकारत होता. पुंडलिकनगर पोलिसांनी शहरातील गुन्ह्यातही त्याला आरोपी केलं असून, त्याचा नव्यानं शोध सुरू झालाय.
दहावी नापास झाला डॉक्टर : मूळ जालन्याचा असलेला सतीश गवारे दहावी नापास आहे. मात्र, स्वतःला बीएएमएस डॉक्टर सांगून तशी बनावट डिग्रीदेखील तो दाखवत होता. जून 2022 मध्ये गर्भपातादरम्यान एका महिलेच्या मृत्यूनंतर याचा हा कारभार उघडकीस आला. त्यातून जामिनावर सुटल्यानंतर जानेवारी 2024 मध्ये गर्भपाताच्या रॅकेटमध्ये तो रंगेहाथ पकडला गेला. मात्र, तेव्हा पसार झाल्यापासून अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 1 लाख 75 हजार रुपयांचे मशीन आणि 25 हजारांचे बडॉमिनल अल्ट्रा साउंड प्रोब अडॉप्टरद्वारे तो लिंगनिदान करायचा. बीड पोलिसांच्या तपासात जवळपास 2 वर्षांचे रेकॉर्ड सापडले होते.
सिल्लोड तालुक्यात सापडले अवैध रुग्णालय : संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं गारखेडा भागात अवैध गर्भपात केंद्र उघडकीस आणले होते. त्याचा तपास पुंडलिकनगर पोलिसांनी सुरू केला. त्याचे अनेक धागेदोरे आणि धक्कादायक माहिती समोर येत गेली. त्यात सिल्लोड मध्ये डॉ रोशन ढाकरे आणि डॉ. किरण ढाकरे हे डॉक्टर दांपत्य प्रसुतीची परवानगी नसतानाही, अवैध गर्भपात करत असताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई केली असून या प्रकरणी आतापर्यंत अल्पवयीन मुलासह 10 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांनी दिली. तर गेल्या सात दिवसांपासून या रॅकेटचा पाठपुरावा करण्यात पोलिसांना यश आलंय. एक मोठा रॅकेट पोलिसांच्या हाती लागले. सिल्लोड येथील रुग्णालयात अवैध गर्भपात झाल्यावर मोकळ्या जागेवर अभ्रकाचे तुकडे करून पिशवीत भरून देत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलीय.