मुंबई : केंद्र सरकारनं मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिलंय. मुंबईमध्ये 300 नव्या लोकल ट्रेन्स (300 New Local Trains for Mumbai) दिल्या जाणार आहेत. तसंच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात माहिती दिली असून यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं आभार मानलंय.
3 मोठ्या योजनांना मंजुरी : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) राज्यातील जनतेनं महायुतीला भरघोस मतदान करुन एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करुन दिला. त्यात भाजपानं सर्वाधिक 132 जागा जिंकल्या. त्यानंतर भाजपानं आता मुंबई आणि आसपासच्या महापालिकाच्या निवडणुकांसाठी कंबर कसल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईकरांसाठी 300 नवीन लोकल ट्रेन्स उपलब्ध होणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं 3 मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे. या सोबतच पोर्ट कनेक्टिव्हिटीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडणारा महत्वकांक्षी कॉरिडॉर सुद्धा तयार करण्यात येणार आहे.
जोगेश्वरी नवीन टर्मिनल तर वसईत मेगा टर्मिनल : मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मध्य रेल्वेमधील परळ, लोकमान्य टिळक टर्मिनल, कल्याण आणि पनवेल या स्थानकांच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. यासह मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनल उभारण्यासह वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल उभारलं जाणार आहे.
सर्व लोकलचे रुपांतर एसी लोकलमध्ये होणार? : मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी लवकरच सर्व लोकलचे रुपांतर एसी लोकलमध्ये करण्यात येणार असून यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. एसी लोकलमुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील सुटेल. गर्दीमुळं आणि दरवाजात उभं राहिल्यामुळं अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. धावत्या लोकलमधून होणारे प्रवाशांचे मृत्यू हा गंभीर प्रश्न आहे. परंतु, एसी लोकलमुळं हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एसी लोकलचे दरवाजे बंद असतात, त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुरक्षित होऊ शकतो. दरम्यान, मुंबईत लोकलचं जाळं हे 390 किमीपर्यंत पसरलंय. यात पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग या तीन प्रमुख मार्गिका आहेत. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांसाठी प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं 27 नोव्हेंबरपासून मुंबईत 13 अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळं पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ही आता 96 वरुन 109 वर पोहोचली आहे.
हेही वाचा -
- ऐन सणासुदीत मुंबईकरांचं टेन्शन वाढलं; तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक नक्की पाहा - Mumbai Local Mega Block
- मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबरपासून होणार बदल, 'या' ठिकाणीही थांबणार जलद लोकल - Mumbai Local Train Update
- प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! पश्चिम रेल्वेच्या 175 लोकल रद्द, ट्रेनच्या वेगावरही येणार मर्यादा; नेमकं कारण काय? - Western Railway Block