महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनिल देशमुख नावाचा उमेदवार काटोल विधान सभेच्या रणांगणात, मतदार संभ्रमात पडण्याची शक्यता

काटोलमध्ये अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी हे समिकरण असताना आता नवीनच अनिल देशमुख या मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. वाचा काय आहे प्रकरण...

अनिल देशमुख यांच्या अर्जातील एक पान
अनिल देशमुख यांच्या अर्जातील एक पान (ईटीव्ही भारत बातमीदार)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

नागपूर : सर्वांचं लक्ष असलेल्या काटोल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अगदी चुरशीची होणार हे आता स्पष्टचं झालं आहे. अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली असताना ऐनवेळी अनिल देशमुख यांनी त्यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. आता अनिल देशमुख यांचा देखील एक अर्ज दाखल झाला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावसाधर्म्य असलेले अनिल शंकराव देशमुख हे नरखेड तालुक्यातील थुगाव (निपाणी) येथील रहिवासी असून त्यांनी अजित पवार पक्षाकडून अर्ज दाखल केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारकडून अनिल शंकराव देशमुख यांनी अर्ज दाखल केला असून तो मान्यही झाला असल्यामुळं मतदारांसमोर संभ्रम निर्माण होणार आहे.

अजित पवारांचा उमेदवार अनिल देशमुख : अनिल शंकराव देशमुख नामक उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. एकीकडे काटोलची जागा महायुतीत भारतीय जनता पक्ष लढवत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडून अनिल शंकराव देशमुख नावाने उमेदवार दिला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अनिल देशमुखांच्या नावाचे मतदार संभ्रमात : गेल्या दोन दशकांपासून अनिल देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, यावेळी त्यांचे चिरंजीव निवडणूक लढवत असल्यानं सर्वांचं लक्ष काटोलकडे लागलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्यापासूनचं अनिल देशमुखांचं काटोल मतदारसंघावर वर्चस्व आहे. अनिल देशमुख १९९६ला काटोल येथून जिंकले आणि आमदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून त्यांनी काटोल मतदारसंघातून १९९९, २००४, २००९, २०१९ मध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळं गेली अनेक वर्षे अनिल देशमुख आणि काटोल हे समीकरण असताना ते यावेळी निवडणूक लढवत नाहीत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर अनिल देशमुख नावाचा उमेदवार रिंगणार असल्यानं मतदार काही प्रमाणात संभ्रमात पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा...

  1. भाजपामुळेच माझ्या पत्नीला कर्करोग झाला, अनिल देशमुखांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
  2. विधानसभा निवडणूक 2024 : काटोलमध्ये काका पुतण्यात रंगणार सामना ? अनिल देशमुखांविरोधात आशिष देशमुख मैदानात ?

ABOUT THE AUTHOR

...view details