आशिष शेलार यांची प्रतिक्रिया मुंबईBullet Train Mumbai :अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला आहे. ठाणे-शिळफाटा ते बीकेसी असा हा बोगदा असणार आहे. तसंच समुद्राखालून जाणारी ही देशातील पहिली बुलेट ट्रेन ठरणार आहे. समुद्राखालून तब्बल 7 किमी बुलेट ट्रेन धावणार आहे. उद्घाटनावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचीदेखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुलेट ट्रेनला उशीर झाल्याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
7 किलोमीटरचा प्रवास समुद्राच्या खालून :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबईतून गुजरातला जाणार आहे. या प्रकल्पाचं काम सध्या महाराष्ट्रासह गुजरातमध्ये प्रगतीपथावर आहे. अहमदाबाद-मुंबई दरम्यान धावणारी ही बुलेट ट्रेन ठाण्यातील ते बीकेसीपर्यंत भूमिगत होणार आहे. हे अंतर 21 किमी असून ट्रेन 7 किमी समुद्राखालून जाणार आहे. देशात प्रथमच अशा पद्धतीनं समुद्राखालून ट्रेन धावणार आहे. 21 किलोमीटर लांबीचा हा बोगदा बांधण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या बोगद्याचं ब्लास्टिंग करण्यात आलं.
उद्धव ठाकरेंमुळं विरोध :यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "मुंबईच्या विकासातील मैलाचा दगड असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामानं वेग घेतला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ केला. मुंबई, महाराष्ट्र, देशाला अभिमान वाटेल अशा या पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज मंत्र्यांच्या हस्ते झाला. या प्रकल्पाचं काम अडीच वर्षांपूर्वी सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र, या कामाला परवानगी नाकारणाऱ्या तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळं विरोध झाला. त्यामुळं जनतेची अडीच वर्षे वाया गेली. त्यामुळं या प्रकल्पाच्या दिरंगाईमुळं खर्च वाढण्याचं पापही उद्धव ठाकरे सरकारला जातं. मात्र आता या प्रकल्पाचं काम वेगानं सुरू आहे.
समुद्राखालून जाणारा देशातील पहिला प्रकल्प : "या 21 किमी लांबीच्या बोगद्यात 7 किमीचं बांधकाम समुद्राखालून होणार आहे. पर्यावरणाच्या लागणाऱ्या सर्व आवश्यक परवानग्या घेऊन एकाच वेळी चार ठिकाणी काम सुरू करण्यात येत आहे. तसंच अत्यंत वेगवान असलेली बुलेट ट्रेन मुंबईसह आपल्या देशाचं, सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. मुंबईकरांच्या वतीनं 'मी' माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो," असे भाजपा नेते शेलार म्हणाले.
'हे' वाचलंत का :
- "येणाऱ्या काळात एकट्याची... "; पंकजा मुंडेंचा इशारा कोणाला?
- बाळासाहेब ठाकरेंचं पत्र अन् जोशी सरांचा लगेच राजीनामा; जावयामुळं मुख्यमंत्रिपद गेलं?
- जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी, जम्मू काश्मीरातही 30 ठिकाणी छापे; काय आहे प्रकरण?