मुंबई NCP Will Merge With Congress ? : लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. राज्यात चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींसोबतच दावे-प्रतिदावे देखील केले जात आहे. अशातच आगामी काळात छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलिन होतील असं, विधान शरद पवार यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडं सत्ताधाऱ्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
विलिनीकरणाचा प्रश्नच येतं नाही - महेश तपासे :"लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल," असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला. "एनडीए प्रणित भाजपा सरकारला नागरिक कंटाळले असून देशात इंडिया आघाडीच्या बाजूने जनतेने झुकतं माप दिलं. त्यामुळेच शरद पवारांनी सांगितलं आहे की, लोकांचा परत विश्वास नेहरू गांधी यांच्या विचारसरणीकडं जात आहे. त्यामुळे देशातील छोटे-मोठे सर्व पक्ष इंडिया आघाडी, काँग्रेस सोबत येतील. काही पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतील, अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली. याला यापूर्वी शरद पवार यांनी ठामपणे नकार दिलाय. शरद पवार यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे की आमच्या पक्षाची विचारसरणी नेहरू गांधी यांच्या विचारसरणीशी मिळती जुळती आहे. म्हणून आम्ही इंडिया आघाडी सोबत आहे. विलनीकरणाचा कुठलाच प्रश्नच येत नाही, शरद पवार यांनी असे कुठलेही संकेत दिले नाहीत," असं महेश तपास यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार परिस्थितीनुसार रंग बदलतात- प्रवीण दरेकर :शरद पवारांच्या विधानानंतर भाजपाकडून देखील प्रतिक्रिया आली आहे. भाजपा आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, "महाराष्ट्र राज्यात तीन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचं काय होणार, याचं चित्र स्पष्ट झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विलिनीकरणाचा पत्ता शरद पवार यांच्याकडून फेकण्याचा प्रयत्न दिसत आहे. शरद पवार परिस्थितीनुसार रंग बदलतात. एका बाजुला हुकूमशाही बोलतात आणि दुसऱ्या बाजुला घराणेशाहीला समर्थन करतात. देशात प्रादेशिक पक्षाची अस्मिता भाजपानं जपली."