महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. आंबेडकर यांच्या हयातीतील पुतळा कोल्हापुरात; स्मारक रखडलं, महापालिकेच्या ठरावालाही केराची टोपली - DR BABASAHEB AMBEDKAR

संपूर्ण देशभरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वाधिक पुतळे आहेत. मात्र, कोल्हापुरातील बिंदू चौक येथे असलेला त्यांचा अर्धाकृती पुतळा विशेष आहे.

Dr Babasaheb Ambedkar Statue Kolhapur
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोल्हापूर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2024, 9:00 PM IST

Updated : Dec 9, 2024, 10:05 PM IST

कोल्हापूर :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतील जगातला पहिला पुतळा कोल्हापुरातील बिंदू चौकात बसवण्यात आला होता. या घटनेला आज 74 वर्षे पूर्ण झाली. कोल्हापुरातील भाई माधवराव बागल यांच्या पुढाकारानं हा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, या ठिकाणच्या स्मारकाचं काम रखडलं असून महापालिकेनं केलेल्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही. या ऐतिहासिक चौकाचं विद्रुपीकरण थांबावा आणि या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारावं, अशी मागणी संविधान सन्मान युवा मोर्चाच्या वतीनं करण्यात आली.

कोल्हापुरातील पुतळ्याला 74 वर्ष पूर्ण : जगभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वाधिक पुतळे असल्याची नोंद आढळते. मात्र, कोल्हापुरातील मराठा नेते भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने कोल्हापुरातील बिंदू चौकात महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे 9 डिसेंबर 1950 या दिवशी उभारण्यात आले होते. या ऐतिहासिक गोष्टीला आज 74 वर्ष पूर्ण झाल्याची माहिती निलेश बनसोडे यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना निलेश बनसोडे (ETV Bharat Reporter)

डॉ. आंबेडकरांनी पाहिला होता पुतळा : महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बाबुराव पेंटर यांनी साकारला होता, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बाळ चव्हाण यांनी निर्माण केला. खुद्द महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा त्यांचा पुतळा कोल्हापूर भेटीत पाहिला होता. कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं या दोन्ही पुतळ्यांची दररोज स्वच्छता करण्यात येते. मात्र, या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्ष संघटनांना कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, असा ठराव कोल्हापूर महापालिकेच्या तत्कालीन महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 16 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. मात्र, अजूनही या ठिकाणी अनेक राजकीय पक्ष, धार्मिक संघटना कार्यक्रम घेत आहेत. यामुळं या ऐतिहासिक चौकात विद्रुपीकरण थांबावं, अशी मागणी कोल्हापुरातील संविधान सन्मान युवा मोर्चाच्या वतीनं करण्यात आली. तसेच या ठिकाणी अनेक वर्ष रखडलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक साकारावं, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

महापालिकेला ठरावाचा पडला विसर : कोल्हापुरातील संविधान सन्मान युवा मोर्चाच्या वतीनं भव्य स्मारकाचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्तावच राज्य सरकारपर्यंत पोहोचलेला नाही. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असूनही या पुतळ्याची डागडुजी आणि रंगरंगोटी केल्या व्यतिरिक्त महापालिकेला गेल्या 74 वर्षात या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात यश आलेलं नाही. निवडणुका आल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं राजकारण करतो. मात्र, बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतील जगातील पहिला पुतळा कोल्हापुरात असूनही या ठिकाणचं स्मारक रखडल्यामुळं कोल्हापूरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -

  1. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाजानं चिंतन करण्याची वेळ"
  2. महापरिनिर्वाण दिनानिमित्तम महामानवाला देशभरातून अभिवादन, चैत्यभूमीवर उसळला जनसागर
  3. महापरिनिर्वाण दिन 2024 : शाळेबाहेर बसणारा विद्यार्थी ते द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जाणून घ्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य
Last Updated : Dec 9, 2024, 10:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details