अमरावती :विदर्भ म्हटलं की विदर्भाच्या शेतातली कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, गहू अशी महत्त्वाची पीकं समोर येतात. फळांमध्ये संत्री उत्पादनात विदर्भ पहिल्या क्रमांकावर आहे. असं असलं तरी केळी उत्पादनात देखील पश्चिम विदर्भातील काही भाग अतिशय समृद्ध असून भविष्यात पश्चिम विदर्भासह पूर्व विदर्भात देखील केळीमुळं शेतकरी समृद्ध होतील, अशी आशा बाळगली जात आहे. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं अमरावतीत 25 डिसेंबरला केळी परिषद आयोजित करण्यात आली आहे. या केळी परिषदेच्या माध्यमातून विदर्भामध्ये केळीचं पीक यशस्वीरीत्या घेण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भात केळीसाठी असणाऱ्या पोषक वातावरणासंदर्भात कृषी तज्ञांनी खास "ईटीव्ही भारत" शी संवाद साधत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
केळी परिषदेचा असा आहे उद्देश : अमरावतीच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या 13 एकर शेत जमिनीवर केळीचं पीक लावण्यात आलं आहे. येथेच श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आणि जळगाव येथील जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमानं 25 डिसेंबरला केळी परिषद होणार आहे. विदर्भात एक पर्यायी पीक म्हणून केळीकडे पाहिलं जातं. येथील शेतकरी अनेक समस्यांना सामोरे जातात. या समस्यांपासून मार्ग काढण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या संकल्पनेतून केळी परिषद आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना केळीचं उत्पादन घेणं आपल्यासाठी कसं सोपं आणि फलदायी आहे हा या परिषदेचा उद्देश असल्याचं श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समीर लांडे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.
"विदर्भात शेतकऱ्यांना केळीचं उत्पादन घेणं सहज शक्य आहे. हे पटवून सांगण्यासाठी एकूण 13 एकर जमिनीवर केळीच्या विविध वाणांची लागवड केली. वाण मे महिन्यात लावलं आणि आता डिसेंबर महिन्यात या वृक्षांवर केळीचे घड आले आहेत. यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि मे महिन्यातील कडाक्याचं ऊन या सगळ्या समस्यांवर मात करत या ठिकाणी केळीची करण्यात आलेली लागवड यशस्वी झाली. पारंपारिक पीक म्हणून या केळीकडे न पाहता या ठिकाणी टिशू कल्चर पद्धतीनं केळीची लागवड करण्यात आली. शेतातली केळी देशाच्या विविध भागासह परदेशात कशी पोहोचेल या संदर्भात देखील या परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार," असं प्राचार्य डॉ. समीर लांडे म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक सारखी वाढलेली एक सारखी पिकलेली आणि एक सारख्या कापलेल्या केळींना अधिक मागणी असल्याची माहिती देखील प्राचार्य डॉ. समीर लांडे यांनी दिली.
अकराव्या महिन्यातच केळीचा घड : "केळी उत्पादनासाठी पूर्वी बेना अर्थात कंद वापरले जायचे. हा कालावधी साधारण 18 महिन्याचा होता. मात्र आता उती संवर्धित अर्थात टिशू कल्चरचं रोप वापरलं जातं. यामुळं घड तयार होण्याचा कालावधी देखील कमी झाला. ग्रँड नाईन अर्थात जी नाईन या वाणाच्या वृक्षाला अकराव्या महिन्यातच केळीचे घड पूर्णतः तयार होतात," अशी माहिती शिवाजी कृषी महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक राजेंद्र पाटील यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. अलिकडच्या काळात विदर्भातील प्रमुख नगदी पीक असलेल्या संत्र्याला हवामान बदलाचा परिणाण आणि अति उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत पर्यायी पीक म्हणून केळी ही फायदेशीर ठरू शकते, असं देखील प्राध्यापक राजेंद्र पाटील म्हणाले.