महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाप शेतकरी असल्यानं बँकांनी नाकारलं कर्ज, माळरानावर उभारली 'बाप' आयटी कंपनी

Baap IT Company: तुमचा बाप नोकरी करत नाही. तुमच्या बापाकडे पगार स्लिप नाही, असं सांगत अनेक बँकांनी त्याला कर्ज नाकारलं. पण, त्यानं हिंमत न सोडता परिस्थितीशी संघर्ष केला. आज आपल्याच गावात खडकाळ माळराणावर 'बाप' नावाचीच आयटी कंपनी उभारत शेतकऱ्यांच्या पोरांना मोठा आधार दिलाय. रावसाहेब घुगे असं या कंपनीच्या मालकाचं नाव आहे.

Baap IT Company
बाप आयटी कंपनी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 5:51 PM IST

Updated : Feb 28, 2024, 6:02 PM IST

शेतात सुरू झाली आयटी कंपनी

अहमदनगरBaap IT Company :संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील रावसाहेब घुगे या तरुणानं गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलं. पुढील शिक्षणासाठी कर्ज मिळावे, यासाठी अनेक बँकांचे उंबरठे झिजवले. मात्र, बापाला नोकरी आणि पगार स्लिप नाही. त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळणार नाही, असं अनेक बँकांकडून सांगण्यात आलं. तरीही जिद्द न सोडता रावसाहेब घुगेंनी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर घुगे नोकरीसाठी अमेरिकेत गेले. तेथील एका आयटी कंपनीत नोकरी करू लागले.

कंपनीच्या नावावर बापाच्या टोपीची प्रतिकृती:बाप शेतकरी असल्यानं अनेक बँकांनी शिक्षणासाठी कर्ज नाकारलं. हा विचार कायम घुगेंना सतावत होता. त्यामुळे त्यांनी काही काळानंतर आपल्या मायदेशी परतण्याचं ठरवलं. यानंतर आपल्याच गावात आयटी कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला. ज्या गावाला जाण्यासाठी धड रस्ताही नाही, त्याच गावात ही कंपनी उभी राहिली. आज त्याच रावसाहेब घुगेंनी शेतकरी बापाला आयटी कंपनीचे डायरेक्टर बनवले आहे. कंपनीच्या प्रवेशद्वारावर शेतकरी बापाच्या टोपीची प्रतिकृती लावून कंपनी सुरू केली आहे.

ग्रामीण मुलांसाठी बाप कंपनी ठरली वरदान:ग्रामीण भागातील मुलं-मुली मोठ्या कष्टानं आपलं शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवतात. मात्र, त्यातील अनेकांना नोकरीसाठी झगडावं लागतं. त्यात अनेकांना त्यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे शहरात नोकरी करायला जमत नाही. त्यात मुलीचं लग्न जर ग्रामीण भागात झालं तर त्यांना उच्च शिक्षण घेऊनही कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना आपलं जणू करियरचं संपलं असं वाटू लागते. त्यापैकीच पुनम सानप ही तरुणी होती. बीई करूनही कौटुंबिक अडचणीमुळे तिला नोकरी सोडावी लागली. त्यानंतर गावात चांगली नोकरी कुठे मिळत नसतानाच तिनं 'बाप' कंपनीत मुलाखत दिली. यापुढे तिच्या पंखाना जणू बळ मिळालं. बाप कंपनी पितृछत्रासारखी तिच्या मागे उभी राहिली.

आशिष शिंदेंनी सांगितला अनुभव:ग्रामीण भागातील अनेक मुलं पदवीचं शिक्षण पूर्ण करतात. मात्र, त्यानंतर आयटीतीलं पुढचं शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाता येत नाही. आशिष शिंदे हा त्या पैकीच एक युवक आहे. तो गावातील कंपनीत नोकरी करून पैसे कमवतो. त्याच पैशातून आपलं पुढचं शिक्षणही पूर्ण करतोय. महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भाग हा वाड्या-वस्त्यावर विखुरला आहे. त्यात छोटं कुटुंब असलेल्या मुलांवर मोठी जबाबदारी येऊन पडते. अशात त्यांना शहरात जाऊन नोकरी करणं अवघड होतं. 'बाप' कंपनीत नोकरी करत असलेले अनेक युवक हे सकाळी दुधाचा व्यवसाय सांभाळत नोकरी करतात. त्यानंतर संध्याकाळी शेतीही करतात.

ग्रामीण युवक-युवतींंना दिला मोठा आधार:संगमनेर तालुक्यातील माळराणावर उभ्या राहिलेल्या कंपनीनं ग्रामीण युवक-युवतींना मोठा आधार तर दिलाच आहे. त्याचबरोबरीनं पन्नास कुटुंबीयांनाही इतर मार्गीने उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध झालंय. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 'बाप बिझनेस अप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म्स' तयार झालेली आहे. ही पहिली ग्रामीण भागातील कंपनी आहे. या कंपनीत सध्या विद्यार्थी, शिक्षक आणि आयटी डेव्हलपर्स म्हणून जवळपास पाचशे जणांचा हा परिवार येथे तयार झाला आहे. भविष्यात शंभर टक्के शेतकरी मुलांना नोकरी देणारी ही कंपनी इतरांनाही पथदर्शी ठरणार आहे.

हेही वाचा:

  1. Pune Fire : पुण्यातील आयटी पार्कमध्ये लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश; शॉर्टसर्किटमुळे लागली आग
  2. आयटी कंपन्यांमधील 74 टक्के अधिकाऱ्यांकडून रॅनसमवेअरचा हल्ला झाल्याचे मान्य
  3. इन्फोसिसच्या नफ्यात २३.७ टक्क्यांची वाढ; मिळविले ४,४६६ कोटी रुपये
Last Updated : Feb 28, 2024, 6:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details