महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत आषाढीचा उत्साह; चर्चगेट स्थानकावर जमला वैष्णवांचा मेळा... - Ashadhi Ekadashi 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 7:03 PM IST

Ashadhi Ekadashi 2024 : यंदाही राज्यभरात मोठ्या उत्साहास आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, ज्या लोकांना कामामुळं पंढरपूरला जाता आलेलं नाही, त्यांच्यासाठी पंढरीच मुंबईच्या चर्चगेट स्थानकावर (Churchgate Station) अवतरलेली दिसली.

Ashadhi Wari 2024
चर्चगेट स्थानकावर जमला वैष्णवांचा मेळा (ETV BHARAT Reporter)

मुंबई Ashadhi Ekadashi 2024 :आषाढी एकादशी निमित्तानं महाराष्ट्रातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झालं आहे. हाती टाळ-मृदंग घेऊन मराठी माणूस पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालाय. पंढरपुरातील चंद्रभागेच्या तिरी विठ्ठल भक्तांचा मेळा जमलाय. आषाढी एकादशीची वारी आणि उपवास करणारे तसंच उदरनिर्वाहासाठी काही लोक मुंबईत येतात, तेंव्हा देखील ते आपली परंपरा कायम ठेवतात. मुंबईतील चर्चगेट स्थानकावर (Churchgate Station) आषाढी एकादशी निमित्ताने विठू माऊलीच्या भक्तांचा मेळा फुलला होता.

चर्चगेट स्थानकावर जमला वैष्णवांचा मेळा (ETV BHARAT Reporter)


मुख्यमंत्री शिंदेंनी केली पांडुरंगाची पूजा :गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून पांडुरंगाची आस लागलेले भाविक वारीच्या माध्यमातून पंढरपूरला जातात आणि चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन तृप्त होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे सपत्नीक पांडुरंगाची पूजा केली. तर दुसरीकडे दररोज घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबईतील गर्दी आज चर्चगेट स्थानातील टाळ मृदंगाचा गजर ऐकून, थांबून सगळ्यांना जय हरी करत विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायलं मिळालं.




टाळ, मृदंग हरी नामाच्या गजराने चर्चगेट स्थानक दुमदुमले : मुंबईतील चर्चगेट स्थानकावर काही लोकांनी अंगात पांढरे शुभ्र धोतर आणि सदरा तर महिलांनी पारंपारिक वेशभूषा धारण केली होती. कपाळावर चंदन, बुक्क्याचा टिळा, हातात टाळ मृदंग, वीणा आणि मुखात पांडुरंगाचा गजर चालू होता. यात मुंबईकर देखील रंगून गेले होते. बोरवली, विरार, मालाड विरार येथील भजनी मंडळ आपल्या परिसरातून चर्चगेटच्या दिशेने लोकलमध्ये दिंडी घेऊन येत असतात. "कानडा राजा पंढरीचा", "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल", "चंद्रभागेच्या तिरी, विठू माझा लेकुरवाळा". "कानडा राजा पंढरीचा", "माऊली माऊली". या गाण्यांनी चर्चगेट स्थानक परिसर दणाणून गेला होता.



वारकरी अन् माऊलींसाठी फराळ : चर्चगेट रेल्वे स्थानकामधून उपनगरातून येणाऱ्या दिंड्यांच्या स्वागतासाठी रेल्वे आणि पोलीस यांना काही सामाजिक संस्था नियोजनासाठी सहकार्य करत असतात. दरवर्षी साधारणतः दीडशे पर्यंत भजनी मंडळं चर्चगेट रेल्वे स्थानकात उपस्थिती लावतात. माऊलीच्या दिंड्या घेऊन येणाऱ्या भजनी मंडळांची फक्त नोंद केली जात असते. आतापर्यंत 50 दिंड्या दाखल झाल्या आहेत. रेल्वे पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाकडून सर्वच भावी भक्तांना राजगिऱ्याच्या लाडूचं वाटप करण्यात आलं. तर काही सामाजिक संस्थांकडून खिचडीचं वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर वारकरी अन् माऊलींसाठी चहा आणि फराळाचा अल्पोपहार स्थानिक संघटनांकडून देण्यात आला.


रेल्वेप्रवासी सामाजिक संस्थेचे 40 वे वर्ष :मुंबईतील बोरवली येथील दिवंगत ढोकेमामा रेल्वे प्रवासी सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी योगेश सावंत म्हणाले की, हे संस्थेचे 40 वे वर्ष आहे. दिंडीसोबत दरवर्षी सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे घेतली जातात. मुंबईत जोरदार पाऊस होऊ दे, असे साकडे त्यांनी विठुरायाला घातले आहे.

हेही वाचा -

  1. वडाळा प्रति पंढरपूर मंदिरात विठूरायांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी - Ashadhi Ekadashi
  2. आषाढी एकादशी 2024 : साई बाबांच्या प्रसादालयात वारकऱ्यांसाठी 70 क्विंटल शाबुदाना खिचडीचा प्रसाद - Ashadhi Wari 2024
  3. आषाढी एकादशीच्या सोहळ्यास उत्साहात सुरुवात; विठूरायाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी - Ashadhi Wari 2024

ABOUT THE AUTHOR

...view details