मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली दुसरी 45 उमेदवारांची यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केलीय. या यादीत माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी आपले निवडणुकीत मुद्दे काय असतील आणि निवडून आल्यानंतर आपण नेमकं काय काम करणार हे जनतेसमोर मांडलंय. तसेच अमित ठाकरे यांनी 23 तारखेला मनसे सत्तेत सहभागी झालेला पक्ष असेल, असा दावादेखील केलाय. साहेबांनी नाव जाहीर केल्यानंतर माझ्या पोटात गोळा आल्याचं सांगत अमित ठाकरेंनी भावना व्यक्त केल्यात. कारण आता मला समजलं आहे की, माझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. मी याआधी जसं वावरत होतो, तसं आता वावरू शकत नाही. मी जे स्वतंत्रपणे राहत होतो, तसं आता राहू शकणार नाही. कारण त्या शासकीय पदाचं ओझं इतकं मोठं असतं की, मी ते ओझं घ्यायला तयार आहे. फक्त आता पोटात गोळा आलाय, जो येईल असं मला वाटलं नव्हतं, असंही अमित ठाकरे म्हणालेत.
इथल्या लोकांशी एक वेगळाच जिव्हाळा :यासंदर्भात माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, आम्ही तीन पिढ्या याच दादर-माहीम परिसरात राहत आलोय. त्यामुळे हा परिसर माझ्यासाठी एक कम्फर्ट झोन आहे. मी माझ्या दैनंदिन कामासाठी जातानादेखील चालत जातो. माझं ऑफिसदेखील इथेच जवळ आहे. मी ऑफिसलादेखील चालत जातो. जाता-येता लोक भेटतात. त्यांच्याशी बोलणं होतं. त्यामुळे इथल्या लोकांशी एक जिव्हाळा निर्माण झालाय. चालत जाताना अनेक लोक भेटतात. त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. सर्वांच्या समस्या सोडवणं शक्य नाही. पण जितक्या शक्य होतील, तितक्या समस्या मी सोडवल्या आहेत. तसं खूप काही मला ईश्वराने दिलंय. त्यामुळे मी कुठे काही मागायला जात नाही.