मुंबई Ajit Pawar On onion export : महाराष्ट्रातील कांद्या प्रश्नाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय. "केंद्रात आणि राज्यात आमच्या विचाराचं सरकार असल्यानं कांदा निर्यातीवर बंदी घालणार नाही," असं थेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीच सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
कांदा निर्यातीवर बंदी नाही :उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले"वाढवन बंदराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी राज्यात येणार आहेत. देशाचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मी उपस्थित होतो. त्यावेळी आम्ही कृषीमंत्र्यांना सांगितलं की, केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणार नाही, अशी आशा आहे. सोयाबीन, कापूस, ऊस या दोन-तीन प्रश्नांवर चर्चा झाली. मला त्यांची काम करण्याची पद्धत आवडली. एक रुपया पीक विम्याचा मार्गही त्यांनी मोकळा केला. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या विषयावर दिल्लीत चर्चा करणार असल्याचं सांगितलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर चर्चा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय."
नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे :"आधार कार्ड बँक लिंक नसल्यामुळं अनेक महिला या योजनेपासून वंचित आहेत. या योजनेचे पैसे भगिनींना पूर्ण देण्यात यावेत, असं निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. लाडक्या बहिणीला सुरक्षा भाऊ देत आहे. कोणत्याही सरकारला एखादी वाईट घटना घडावी, असं वाटत नाही. त्यामुळं आशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे, अशा प्रकारे सरकारनं पावले उचलली आहेत,"असे अजित पवारांनी सांगितलं.