बारामती Ajit Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये सातत्यानं आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शुक्रवारी बारामतीतील बूथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला. कुटुंबात एकटं पाडलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला तर मी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कुटुंबात एकटं पाडलं जात आहे : "भाजपाबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय सर्वानुमते झाला होता. परंतु वरिष्ठांनी यात सातत्यानं चाल-ढकल केली. राजीनामा नाट्य घडवून आणलं. त्यांना सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं होतं. मी आजवर त्यांच्यासाठी खूप काही केलं. पण आता पक्ष चोरला म्हणून माझी बदनामी केली जात आहे. कुटुंबातही मला एकटं पाडलं जात आहे" असे आरोप अजित पवारांनी केले.
नुसत्या सेल्फी काढून प्रश्न सुटत नाहीत : यावेळी बोलताना अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही जोरदार टीका केली. "नुसत्या सेल्फी काढून आणि संसदेत भाषणं करून प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी विकासकामं करण्याची धमक लागते. मी नुसती सभागृहात भाषणं केली असती तर विकास झाला असता का?", अशी बोचरी टीका त्यांनी केली. शरद पवारांवर टीका करताना, "तरुण पिढीला वरिष्ठांनी मार्गदर्शन करायचं असतं. काही चुकलं तर कान धरायचे असतात. आशीर्वाद द्यायचा असतो. परंतु तसं घडलं नाही", असं अजित पवार म्हणाले.
जागावाटपानंतरच बारामतीचा उमेदवार जाहीर : "महायुतीचं जागा वाटप झाल्यानंतर मी बारामतीचा उमेदवार जाहीर करेन. अजित पवारच अध्यक्ष आहे असं समजून काम करा", असं ते म्हणाले. "मी पक्ष चोरलेला नाही. मी कालही राष्ट्रवादीत होतो, आजही आहे आणि उद्याही राहील. मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नका", असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, "आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला विजयी करा, अन्यथा मी निवडणूक लढवणार नाही", असा इशाराही दिला.
हे वाचलंत का :
- बारामतीत 'नणंद विरुद्ध भावजय' लढत? सुनेत्रा पवारांचा प्रचाराचा रथही तयार, फक्त उमेदवारीची घोषणा बाकी
- आरोप करायचे अन् पक्षात प्रवेश द्यायचा, ही भाजपाची स्टाईल; चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
- आमदार अपात्र झाले तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून तो काढून घेतात यावर काय अपेक्षा करायची - सुप्रिया सुळे