मुंबई-महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली होती. यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेचा देखील समावेश होता. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण तसेच रोजगारासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचं सरकारनं म्हटलं होतं. दरम्यान, आता राज्य सरकारने जागतिक बँकेसोबत 23 कोटी रुपयांचा करार केला असून, कौशल्य विकास विभागाच्या मार्फत प्रभावीपणे योजना राबवणार असून, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांसह राज्यभर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून 100 दिवसांत 50 हजार युवक आणि युवतींना प्रशिक्षण देणार असल्याचं कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलंय. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
रोजगार मेळाव्याचे आयोजन :पुढे बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, पुढील 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता या विभागाला विशेष महत्त्व आहे. कारण राज्यात मोर्चे आणि आंदोलन हे रोजगार आणि नोकरीसाठी होतात. त्यामुळे या विभागात अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. तसेच कौशल्य, उद्योजकता आणि रोजगार या विभागात 100 दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून, यावर त्वरित कार्यवाहीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तसेच आगामी काळात म्हणजे 100 दिवसांत नोकरी आणि रोजगारासाठी 100 रोजगार मेळाव्यांचे आयोजनसुद्धा केले जाणार असल्याची माहिती यावेळी मंत्री लोढांनी दिलीय.