अहमदनगर (शिर्डी) Donations Shirdi Sai temple :साईबाबा संस्थानच्यावतीनं 16 एप्रिल ते 18 एप्रिल असा तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आलाय. या तीन दिवसात 2 लाखाहून अधिक भाविकांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलय. तसंच या उत्सव काळात साईबाबांना भाविकांनी केलेल्या दानाची आज साईबाबा संस्थानच्या वतीनं मोजणी करण्यात आलीय.
साईभक्तांचे सढळ हाताने दान :साईबाबा मंदिर परिसरातील देणगी काऊंटरवर 57 लाख 59 हजार 883 रुपये भाविकांनी रोख स्वरूपात दान दिलय. तसंच व्ही व्ही पासेसच्या माध्यमातून जनरल देणगी म्हणून 26 लाख 89 हजार 400 रुपये संस्थानला प्राप्त झालेत. साईबाबा मंदिरातील तसंच परिसरातील दक्षिणा पेटीत गुप्तदान 1 कोटी 42 लाख 79 हजार 209 रुपये भाविकांनी टाकलय. त्याच बरोबर जे भाविक शिर्डीत येऊ शकले नाहीत अशा भाविकांनी डेबीट, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक, डीडी, मनिऑर्डरच्या माध्यमातून 1 कोटी 46 लाख 27 हजार 546 देणगी दिलीय. याचबरोबर 77.600 ग्रॅम वजनाचे तब्बल 4 लाख 91 हजार 715 रुपयांचे सोने आणि 1681 ग्रॅम वजनाची 98 हजार 54 रुपये किंमतीची चांदीही भाविकांनी साई चरणी अर्पण केलीय. तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सवात भाविकांनी एकूण 3 कोटी 79 लाख 35 हजार 715 रुपयांचं विविध माध्यमातून दान केलय.
बुंदीच्या लाडवाच्या प्रसादाला विशेष पसंती :शिर्डीत आलेले भाविक साई संस्थान मार्फत विक्री केल्या जाणाऱ्या शुध्द तुपातील बुंदी लाडुला पसंती देत असतो. उत्सव काळात एक नग असलेले तब्बल 4 लाख 43 हजार 149 लाडू पाकीटे भाविकांनी विकत घेतली. त्याची किंमत 45 लाख 31 हजार 390 रुपये इतकी आहे. याच बरोबरीने तीन लाडू असलेले 8332 पाकीटे भाविकांनी खरेदी केली. त्या विक्रीतून 2 लाख 8 हजार 300 रुपये मिळाले आहेत. तसंच साई मंदिरातून भक्त दर्शन करून बाहेर पडतो, त्यावेळी प्रत्येक भाविकाला बुंदीचे पाकीट प्रसाद म्हणून दिले जाते. उत्सवाच्या तीन दिवसात 1 लाख 66 हजार 400 पाकीटे भाविकांना दिली गेली आहेत.