ॲडलेड AUS vs IND 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना आजपासून ॲडलेडच्या मैदानावर सुरु झाला आहे. गुलाबी चेंडूनं खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा मैदानात उतरला तेव्हा प्रत्येकाच्या हातावर काळी पट्टी बांधली होती, त्यामागं एक खास कारण समोर आलं. खरं तर, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपला दिवंगत खेळाडू फिल ह्यूजेसच्या स्मृतीप्रित्यर्थ काळी पट्टी बांधली होती, ज्याचा शेफिल्ड शील्ड सामन्यात फलंदाजी करताना बाउन्सर चेंडू लागून मृत्यू झाला होता.
ह्यूजच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम : फिल ह्युजेसचा 10 वर्षांपूर्वी मैदानावर फलंदाजी करताना बाउन्सर चेंडू लागून मृत्यू झाला तेव्हा संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला होता आणि भारतीय संघही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ह्यूजच्या मृत्यूला आता 10 वर्षे पूर्ण होत असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्याच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याशिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ह्यूजच्या स्मरणार्थ आणि त्याच्या सन्मानार्थ भारताविरुद्धच्या ॲडलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी हातावर काळ्या पट्टी बांधून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ह्यूजचा मृत्यू झाला तेव्हा त्यानं ऑस्ट्रेलियन संघासाठी 26 कसोटी सामने खेळले होते.