मुंबई Players Retention List : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या हंगामापूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. हा लिलाव या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला होऊ शकतो. पण त्याआधी, सर्व 10 फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन केलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी तयार करुन BCCI ला सबमिट करावी लागेल. त्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे. विशेष म्हणजे दिवाळीचा सणही त्याच दिवशी आहे.
BCCI नं जाहीर केले नियम : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) नुकतेच रिटेन्शनबाबत नवीन नियम जारी केले आहेत. यानुसार फ्रँचायझी जास्तीत जास्त 6 खेळाडूंनाच रिटेन करु शकते. जर एखाद्या संघानं 6 पेक्षा कमी खेळाडूंना रिटेन केलं, तर अशा स्थितीत फ्रँचायझीला लिलावादरम्यान राईट टू मॅच कार्ड वापरण्याची संधी मिळेल. मात्र रिटेन केलेल्या खेळाडूंची अधिकृत यादी समोर येण्यापूर्वीच अटकळ सुरु झाली आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडू शकतो, असं अनेक रिपोर्ट्समध्ये बोललं जात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचीही अटकळ आहे. सर्व 10 फ्रँचायझी कोणते खेळाडू कायम ठेवू शकतात ते जाणून घ्या.
मुंबई संघ 4 खेळाडूंना रिटेन करणार : 5 वेळा IPL विजेता मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझी आपला कर्णधार हार्दिक पांड्या, माजी कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवू शकते. याची शक्यता खूप जास्त आहे. याशिवाय, यष्टीरक्षक इशान किशन आणि तिलक वर्मा या फलंदाजांसाठी राईट टू मॅच कार्ड वापरु शकतो.
धोनी चेन्नई संघात खेळण्यावर सस्पेन्स : धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) नं देखील 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. हा संघ अनेक स्टार खेळाडूंनी भरलेला आहे. अशा परिस्थितीत CSK फ्रँचायझी कर्णधार ऋतुराज गायकवाड, माजी कर्णधार धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना आणि रचिन रवींद्र यांना रिटेन करु शकते, अशी माहिती क्रिकबझनं दिली आहे. BCCI च्या नवीन नियमांनुसार, 5 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूला अनकॅप्ड मानलं जाईल. अशा परिस्थितीत धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघासोबत राहू शकतो. मात्र, धोनीनं अद्याप तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट केलेले नाही. माहीच्या वक्तव्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल.
3 वेळा विजेत्या कोलकाताचं काय होणार? : कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) 3 वेळा IPL चं विजेतेपद पटकावलं आहे. यावेळी त्यांना रिटेन करण्याच्या खेळाडूंची यादी तयार करताना डोकेदुखीचा सामना करावा लागू शकतो. समोर येणारी मोठी गोष्ट म्हणजे KKR संघ आपला कर्णधार श्रेयस अय्यरला सोडू शकतो. तर हा KKR संघ आंद्रे रसेल, सुनील नरेन, रिंकू सिंग आणि मिचेल स्टार्क यांना रिटेन करु शकतो. तर हर्षित राणाला अनकॅप्ड खेळाडू म्हणूनही ठेवू शकतो.
हैदराबाद संघ क्लासेन आणि कमिन्सला रिटेन करण्याची शक्यता : सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ यावेळी कर्णधार पॅट कमिन्स, हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांना कायम ठेवू शकतो. तर ट्रॅव्हिस हेड आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यासाठी राईट टू मॅच कार्ड वापरलं जाऊ शकतं.