गकबेर्हा WTC Scenario After SA beat SL : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघानं दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पराभव केला आहे. सेंट जॉर्ज मैदानावर 109 धावांनी पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेनं ही दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आहे. टेम्बा बावुमाच्या संघानं श्रीलंकेला 348 धावांचं लक्ष्य दिलं होतं, ज्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेला केवळ 238 धावा करता आल्या. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची शर्यतही जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाला मागे टाकत त्यांनी गुणतालिकेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आफ्रिकेचा सर्व विभागात चांगला खेळ :WTC च्या दृष्टिकोनातून हा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी खूप महत्त्वाचा होता. यात संघातील अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. 347 धावांचा बचाव करताना केशव महाराजनं अप्रतिम गोलंदाजी करत 25 षटकांत 76 धावांत 5 बळी घेतले. कागिसो रबाडा आणि डेन पीटरसननं 2-2 विकेट घेतल्या. तर मार्को जॉन्सननं 1 विकेट घेतली. पहिल्या डावात पीटरसननं 5 बळी घेत 30 धावांची आघाडी घेतली होती. संपूर्ण सामन्यात त्यानं 7 विकेट घेतल्या. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आलं.
मालिकाही घातली खिशात : दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांव्यतिरिक्त फलंदाजांनीही आपलं काम चोख बजावलं. कर्णधार टेंबा बावुमानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. यादरम्यान रायन रिकेल्टन आणि काइल व्हेरिन यांनी शतकं झळकावली. कर्णधार बावुमानं स्वत: अर्धशतक झळकावलं, ज्याच्या जोरावर त्याचा संघ पहिल्या डावात 358 धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात श्रीलंकेला 328 धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही कर्णधार बावुमा आणि एडन मार्करामच्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 317 धावा केल्या. पहिल्या डावात 30 धावांच्या आघाडीच्या जोरावर 348 धावांचं एकूण लक्ष्य देण्यात आले. यानंतर श्रीलंकेचा संघ 238 धावांवर गारद झाला आणि सामन्यासह त्यांनी मालिकाही जिंकली.