सेंच्युरियन SA vs PAK 2nd T20I Live Streaming : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा T20 सामना आज 13 डिसेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क इथं होणार आहे.
पहिल्या T20 सामन्यात काय झालं :पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 8 गडी गमावून केवळ 172 धावा करु शकला. यासह यजमान संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिका मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, पाकिस्तान संघ दुसऱ्या वनडेत पुनरागमन करु इच्छितो. परिणामी दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. यापुर्वी दक्षिण आफ्रिकेनं 2018/2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध T20 मालिका जिंकली होती. त्यानंतर आता हा सामना जिंकत आफ्रिकेला 6 वर्षांनी पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकण्याची संधी असेल.
दोन्ही संघातील हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 23 आंतरराष्ट्रीय T20 सामने झाले आहेत. त्यापैकी पाकिस्ताननं 12 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेनं 11 सामने जिंकले आहेत. यात सध्या पाकिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. पण दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नाही.
सुपरस्पोर्ट पार्कची खेळपट्टी कशी असेल : सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्कमधील खेळपट्टी सामान्यत: चांगली उसळी देते आणि चेंडू सामान्य ट्रॅकपेक्षा वेगानं बॅटपर्यंत पोहोचतो. त्यामुळंच हे स्टेडियम वेगवान गोलंदाजांसाठी चांगलं मानलं जातं. विशेषत: नवीन चेंडू फलंदाजांना अधिक त्रास देऊ शकतो. पण ही विकेट फलंदाजीसाठीही चांगली मानली जाते. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, जेणेकरुन प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखता येईल.
या मैदानावर नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 सामना खेळवण्यात आला. ज्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 219 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 208 धावा करु शकला.
सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवरील T20 सामन्यांची आकडेवारी कशी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 18 T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 9 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 9 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय एक सामना बरोबरीत किंवा अनिर्णित राहिला आहे.
कोणत्या संघाची सर्वोच्च धावसंख्या : सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेनं सर्वोच्च सांघिक धावसंख्या केली आहे. 26 मार्च 2023 रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं 4 गडी गमावून 259 धावा केल्या होत्या. याशिवाय दक्षिण आफ्रिकेनंच या मैदानावर सर्वात कमी धावा केल्या आहेत. 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानविरुद्ध 100 धावांपर्यंत मर्यादित होता.
सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सर्वाधिक धावा आणि विकेट कोणाच्या नावावर आहेत?
सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेननं सर्वाधिक धावा केल्या आहेत. हेनरिक क्लासेननं 8 T20 सामन्यांमध्ये 219 धावा केल्या आहेत, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. या मैदानावर हेनरिक क्लासेनची सरासरी 31.28 आहे. याशिवाय सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस्तोफर हेन्री मॉरिसच्या नावावर आहे. ख्रिस मॉरिसनं 4 सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या आहेत.