पॅरिस Paris Olynmpics 2024 Archery : भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीनं बुधवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 1/16 एलिमिनेशन फेरीत डच (नेदरलँड्स) तिरंदाज रोफेन क्विंटीचा 6-2 असा पराभव करुन 1/8 फेरीत प्रवेश केला. दीपिकानं सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवलं आणि तिच्या प्रतिस्पर्ध्यानंही काही चुका केल्या, ज्यामुळं सामना तिच्या बाजूनं फिरला.
6-2 नं मिळवला शानदार विजय :दीपिकानं पहिल्या सेटची सुरुवात 29 गुणांसह केली, तर तिच्या डच प्रतिस्पर्ध्याला केवळ 28 गुण मिळू शकले. भारतीय तिरंदाज दोन सेट पॉइंटनं आघाडीवर होती. पण रोफेननं सामन्यात पुनरागमन केलं. तिनं पुढच्या सेटमध्ये दीपिकाच्या 27 गुणांविरुद्ध 29 गुण मिळवले आणि 2-2 अशी बरोबरी साधली. डच तिरंदाजानं तिसऱ्या सेटमध्ये एक विचित्र शॉट मारला, ज्यामुळं तिचे 0 गुण झाले आणि त्यानंतर तिनं तो सेट गमावला. यानंतर भारतीय तिरंदाजाने शेवटच्या सेटमध्ये चमकदार कामगिरी सुरु ठेवत प्रतिस्पर्ध्याचा 6-2 असा पराभव केला.
आधीच्या सामन्यात शेवटच्या क्षणी विजय :तत्पूर्वी, तिनं टायब्रेकरवर गेलेल्या लढतीत इस्टोनियन प्रतिस्पर्धी परनाट रेनाचा पराभव केला. भारतीय तिरंदाज हा सामना लवकरच संपवेल अशी अपेक्षा होती. परंतु चौथ्या सेटमध्ये तिनं लय गमावली आणि तिच्या प्रतिस्पर्ध्याला बरोबरीची संधी दिली. यानंतर स्कोअर 5-5 झाला आणि रीनानं शूट-ऑफमध्ये आठ गुण मिळवले. परंतु दीपिकानं 9 गुण मिळवून सामना जिंकला. 30 वर्षीय दीपिका ही देशाची सर्वात यशस्वी तिरंदाज आहे. तिनं जागतिक स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांसह अनेक पदकं जिंकली आहेत. दीपिका तिचा पुढचा सामना 3 ऑगस्ट रोजी दुपारी 1:52 वाजता जर्मन प्रतिस्पर्धी क्रॉप मिशेलविरुद्ध खेळेल. यात विजय मिळवल्यास ती उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र होणार आहे.
हेही वाचा :
- बॉक्सर लोव्हलिनाचा विजयी 'पंच'; पदक निश्चित करण्यापासून फक्त एक 'विजय' दूर - Paris Olynmpics 2024
- कोल्हापुरच्या पठ्ठ्याचा पॅरिसमध्ये अचूक 'नेम'; नेमबाजीत देशाला मिळवून देणार आणखी एक पदक? - Paris Olynmpics 2024
- स्टार शटलर सेनचा 'लक्ष्य'वेधी विजय; जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या क्रिस्टीचा सरळ सेटमध्ये पराभव - Paris Olynmpics 2024