ढाका Murder Case Registered on IPL Star : पाकिस्तानातील रावळपिंडी इथं कसोटी सामना खेळत असलेल्या शाकिब अल हसनला खूप वाईट बातमी मिळाली आहे. बांगलादेशच्या माजी कर्णधारावर थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाकिब अल हसनवर ढाका येथील कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे. यात केवळ साकिबच नाही तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह एकूण 500 लोकांना आरोपी करण्यात आलं आहे. शाकिब सध्या रावळपिंडी इथं एक कसोटी सामना खेळत आहे. ज्यात त्यानं आतापर्यंत 27 षटकांत 109 धावा देत एक विकेट घेतली आहे.
शाकिब अल हसन मोठ्या संकटात : बांगलादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, साकिबविरुद्ध ढाका मेट्रोपॉलिटन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफिकुल इस्लाम असं गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून ते ढाका इथं झालेल्या आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्या व्यक्तीचे वडील आहे. शाकिब अल हसन हा बांगलादेश अवामी लीगचा नेता तसंच खासदार होता. जो शेख हसीनाचा पक्ष होता. बांगलादेशातील सत्तापालटानंतर शेख हसीना देशाबाहेर गेल्या. शकिब अल हसन शेख हसीना यांच्या जवळचा असल्यानं याच कारणावरुन त्याच्यावर असे गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता आहे.