ब्रिस्बेन AUSW Beat INDW by 122 Runs : रविवार, 8 डिसेंबर हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी चांगला ठरला नाही आणि याचं कारण ऑस्ट्रेलियानं भारतीय संघांना 2 तासांच्या आत दोनदा पराभूत केलं. एकीकडे ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा 10 धावांनी पराभव केला, तर अवघ्या 2 तासांनंतर ऑस्ट्रेलियन महिला संघानं दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा वाईट पद्धतीनं पराभव केला. ॲडलेडपासून सुमारे 2000 किलोमीटर दूर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एलिस पेरी आणि जॉर्जिया वॉल यांच्या शानदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 371 धावा केल्या आणि त्यानंतर भारताचा 122 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला.
भारताचा पराभव : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी सकाळी ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर मैदानावर खेळला गेला. यजमान ऑस्ट्रेलियानं याआधीच विजयानं मालिकेची सुरुवात केली होती. भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती पण त्यांच्यावर घरच्या मैदानावर मात करणं अजिबात सोपं नाही हे वर्ल्ड चॅम्पियन संघानं दाखवून दिलं. नियमित कर्णधार ॲलिसा हिलीशिवाय या मालिकेत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघानं आपल्या स्फोटक फलंदाजीनं भारतीय संघाचा पराभव केला.
कांगारुंची आक्रमक सुरुवात : ऑस्ट्रेलियासाठी, फोबी लिचफिल्ड आणि जॉर्जिया वॉल या युवा सलामी जोडीनं जबरदस्त सुरुवात केली आणि अवघ्या 19 षटकांत 130 धावा जोडल्या. लिचफिल्ड 60 धावा करुन बाद झाली, परंतु वॉल, केवळ दुसरा वनडे सामना खेळत असताना, शानदार शतक झळकावल्यानंतर ती आउट झाली. या 21 वर्षीय फलंदाजानं केवळ 87 चेंडूत 12 चौकारांसह 101 धावांची खेळी केली. बाद होण्यापूर्वी वॉलनं अनुभवी अष्टपैलू एलिस पेरीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची जलद भागीदारी केली. लिचफिल्ड आणि वॉलला वेगवान गोलंदाज सायमा ठाकोरनं बाद केलं.