इंदौर Century in 36 Balls : गुजरातचा 26 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज उर्विल पटेलनं एका आठवड्यात सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीमध्ये दुसरा धमाका केला आहे. त्यानं T20 मध्ये आणखी एक आक्रमक शतक झळकावलं आहे. जरी या शतकातील वेग मागील शतकापेक्षा थोडा कमी झाला असेल. पण याचा अर्थ असा नाही, T20 मधील सर्वात वेगवान भारतीय शतकांमध्ये त्याची गणना होणार नाही. भारतीय फलंदाजांनी झळकावलेल्या T20 शतकांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीचा राजा उर्वील देखील आहे. यावेळी उर्विल पटेलनं उत्तराखंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शतक झळकावलं.
36 चेंडूत झळकावलं वादळी शतक : एका आठवड्यात उर्विल पटेलनं आपल्या कारकिर्दीतील दुसरं आक्रमक T20 शतक अवघ्या 36 चेंडूत झळकावलं. यासह त्यानं युसूफ पठाणचा 14 वर्षे जुना विक्रम मोडला. युसूफ पठाणनं 2010 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 चेंडूत शतक झळकावलं होतं.
36 चेंडूत शतक, 41 चेंडूत 115 धावा, गुजरातचा विजय : उत्तराखंडविरुद्ध उर्विलची एकूण खेळी 41 चेंडूंची होती, ज्यात त्यानं 280.49 च्या दमदार स्ट्राइक रेटनं फलंदाजी केली. यात उर्विलनं 11 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 115 धावा केल्या. उर्विलच्या या दमदार कामगिरीमुळं गुजरातनं उत्तराखंडविरुद्धचं 183 धावांचं लक्ष्य अवघ्या 13.1 षटकांत पूर्ण केले आणि सामना 8 गडी राखून जिंकला.
27 नोव्हेंबर रोजी 28 चेंडूत T20 शतक : याआधी सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीमध्ये उर्विल पटेलनं 28 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्रिपुराविरुद्ध झळकावलेलं ते शतक हे कोणत्याही भारतीय फलंदाजानं T20 मधील सर्वात जलद शतक ठरलं. ते शतक झळकावताना उर्विलनं ऋषभ पंतचा 32 चेंडूंचा विक्रम मोडला. एवढंच नाही तर विश्वविक्रम मोडण्यात तो थोडक्यात बचावला. सर्वात वेगवान T20 शतक झळकावण्याचा विश्वविक्रम एस्टोनियाच्या साहिल चौहानच्या नावावर आहे, ज्यानं सायप्रसविरुद्ध 27 चेंडूत हा पराक्रम केला.
हेही वाचा :
- ॲडलेडच्या 'पिंक बॉल' कसोटीत भारताकडून पाच खेळाडू करणार 'डेब्यू'
- 6,6,6,6,6,6...अवघ्या 28 चेंडूत झळकावलं विस्फोटक शतक; 27 कोटीच्या खेळाडूचा विक्रम केला इतिहासजमा