ढाका BAN vs SA 1st Test Live Streaming : बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ याच्यात आजपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. यातील पहिला सामना आज 21 ऑक्टोबरपासून (सोमवार) ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्याचं महत्त्व अधिक मानलं जात होतं. कारण हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनचा निरोपाचा सामना होता. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव आणि शाकिबच्या बाजूनं चालू असलेल्या राजकीय अस्वस्थतेमुळं स्टार क्रिकेटरला अनुपलब्ध राहावं लागलं. भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या व्हाईटवॉशनंतर बांगला टायगर्स अडचणीत आले आहेत. पण ते आफ्रिकन संघाविरुद्ध नव्यानं सुरुवात करण्याचा विचार करत असतील.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश दोन्ही संघ कसोटी सामन्यांमध्ये 14 वेळा आमने-सामने आले आहेत. या 14 सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेनं 12 सामने जिंकले आहेत तर बांगलादेशनं एकदाही विजय मिळवलेला नाही. 2 सामने अनिर्णित राहिले. दोघांमध्ये रोमांचक मालिका अपेक्षित आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये काय परिस्थिती :तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत बोलायचं झालं तर बांगलादेश संघाचे 6 सामन्यांत 2 विजय आणि 3 पराभवांसह 33 गुण आणि 34.38 पीसीटी आहेत आणि संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत, दक्षिण आफ्रिका संघाचे 8 सामन्यांत 3 विजय, 2 पराभव आणि 1 अनिर्णितसह 28 गुण आणि 38.89 PCT असून संघ पाचव्या स्थानावर आहे. परिणामी दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी मालिका पाहायला मिळणार आहे.
खेळपट्टी कशी असेल : शेर-ए-बांगला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामान्यत: फलंदाजांना मदत मिळते. मात्र, जसजसा सामना पुढं जाईल तसतशी वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी आणि वेग मिळण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, ट्रॅकवर उपस्थित गवत पहिल्या काही दिवसांच्या सकाळच्या सत्रात फलंदाजांसाठी काही समस्या निर्माण करु शकतात. पण खेळाच्या शेवटच्या दिवसांत खेळपट्टीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. जिथं फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. नाणेफेक जिंकणारा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी खेळवला जाईल?
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता खेळला जाईल.