होबार्ट Australia Creats History : जे अपेक्षित होतं तेच घडलं. तिसऱ्या T20 सामन्यातही ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघानं पाकिस्तानचा दारुण पराभव करुन मालिकेत पाकिस्तानचा व्हाईटवॉश केला. मात्र, याआधी वनडे मालिका खेळली गेली ती मालिका पाकिस्ताननं जिंकली होती. मात्र T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानला सतत पराभूत करत आहे.
ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव : तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर सलग सातवा विजय आहे. याआधी कोणत्याही संघाला सलग इतक्या सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत करता आलं नव्हतं. 2023 ते 2024 या कालावधीत न्यूझीलंडनं सलग सहा सामन्यांत पाकिस्तानचा पराभव केला होता. जोपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संबंध आहे, त्यांनी 2019 पासून पाकिस्तानकडून एकही सामना गमावलेला नाही आणि या मालिकेतही त्यांनी विरोधी संघाचा व्हाईटवॉश केला आहे.
श्रीलंका आणि इंग्लंडनंही सलग अनेक सामन्यांमध्ये पराभव केला :श्रीलंका आणि इंग्लंडच्या संघांना T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग पाच सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव करण्यात यश आलं आहे. 2019 ते 2022 पर्यंत श्रीलंकेनं पाकिस्तानचा 5 सामन्यात पराभव केला होता. तर इंग्लंडनं 2022 ते 2024 आणि त्यापूर्वी 2012 ते 2015 या कालावधीत सलग 5 सामन्यांमध्ये पराभव केला होता. आता ऑस्ट्रेलिया हा पाकिस्तानला सलग सर्वाधिक सामन्यात पराभूत करणारा संघ बनला आहे.
ऑस्ट्रेलियानं सहज जिंकला सामना :सामन्याचा विचार केला तर मोहम्मद रिझवानच्या अनुपस्थितीत पाकिस्तानी संघाची कमान आगा सलमानच्या हाती होती. पाकिस्तानी संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि आपल्या कोट्यातील पूर्ण 20 षटकंही खेळू शकला नाही. पाकिस्तानी संघ 18.1 षटकांत केवळ 117 धावा करु शकला. एकेकाळी पाकिस्तानी संघ मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असलं तरी तसं झालं नाही. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघानं 11.2 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा करत सात विकेट्स राखून सामना जिंकला.
हेही वाचा :
- मालिका गमावल्यानंतर कीवी संघ श्रीलंकेत प्रतिष्ठा राखणार? शेवटचा वनडे सामना 'इथं' पाहा लाईव्ह
- पाकिस्तानमध्ये खेळाडूंच्या हॉटेलला भीषण आग, थोडक्यात बचावले क्रिकेटपटू; मोठी स्पर्धा रद्द