सेंट किट्स WI Clean Sweep BAN : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना 12 डिसेंबर रोजी सेंट किट्समधील वॉर्नर पार्कवर खेळला गेला. हा सामनाही यजमान करेबियन संघानं जिंकत पाहुण्या बांगलादेश संघाचा 3-0 नं क्लीन स्वीप केला आहे.
वेस्ट इंडिजच्या संघामध्ये बदल :या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून विंडीज संघानं या मालिकेत अजिंक्य आघाडी मिळवली होती, त्यामुळं या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग 11 मध्येही बदल करण्यात आले होते. या सामन्यात 27 वर्षीय यष्टीरक्षक आणि डावखुरा फलंदाज आमिर जांगू याला वेस्ट इंडिज संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यानं सामना जिंकून देणारं शतक झळकावून संघ व्यवस्थापनाचा निर्णय पूर्णपणे सिद्ध केला. चौथ्या स्थानावर आलेल्या जांगूनं विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळं वेस्ट इंडिजचा संघही या मालिकेत क्लीन स्वीप करण्यात यशस्वी ठरला.
आमिर जांगू हा वेस्ट इंडिजचा पहिला खेळाडू : मालिकेतील शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघानं 5 विकेट गमावून 321 धावा केल्या होत्या, त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि 86 धावसंख्येपर्यंत 4 विकेट गमावल्या. येथून केसी कार्टीला आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या आमिर जंगूची साथ मिळाली आणि दोघांमध्ये 5व्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. केसी कार्टी 95 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर जंगूनं एका टोकापासून डावावर नियंत्रण ठेवत संघाला विजयाकडे नेण्याचं काम सातत्यानं केलं.