महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं, अफगाणिस्ताननं बांगलादेशचा केला 8 धावांनी पराभव - T20 World Cup 2024 - T20 WORLD CUP 2024

t20 world cup 2024: राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्ताननं टी - 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्ताननं उपांत्य फेरी गाठली आहे.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 8:31 AM IST

Updated : Jun 25, 2024, 12:01 PM IST

AFG vs BAN :अफगाणिस्ताननं टी 20 क्रिकेट विश्वचषकातल्या सामन्यात बांगलादेशला हरवून इतिहास रचला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्ताननं बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्ताननं उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरी खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. भारतासह अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेनं उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं.

लिटन दासनं शेवटपर्यंत झुंज दिली: या सामन्यात पावसाचा व्यत्यय येत होता. डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला 19 षटकांत 114 धावांचं लक्ष्य मिळालं. मात्र बांगलादेशचा संघ 17.5 षटकांत 105 धावांत सर्वबाद झाला. बांगलादेशसाठी सलामीवीर लिटन दासने शेवटपर्यंत झुंज दिली, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. लिटन दासनं 49 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकारांची आतषबाजी केली. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. बांगलादेशच्या 9 फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही.

राशिद खान- नवीन उल हक चमकले:अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खान आणि नवीन उल हक यांनी सर्वाधिक 4-4 विकेट घेतल्या. याशिवाय फजलहक फारुकी आणि गुलबदीन नायब यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाल्या.

अफगाणिस्तानची फलंदाजी :अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी 59 धावा जोडल्या. रहमानउल्ला गुरबाजनं 55 चेंडूत 43 धावांची खेळी केली. त्यानं आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर इब्राहिम झद्राननं 29 चेंडूत 18 धावांचे योगदान दिलं. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खाननं शेवटच्या षटकांमध्ये 10 चेंडूत 19 धावा केल्या. अशा प्रकारे अफगाण संघानं 20 षटकात 5 विकेट गमावत 115 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून रिशद होसेन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रिशाद हुसेननं 4 षटकात 26 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाल्या.

हेही वाचा

  1. विश्वचषकातील वचपा काढला; टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, 'रो'हिट' वादळा'ची सेमीफायनलमध्ये दिमाखदार एन्ट्री - T20 World Cup India Beat Australia
  2. कांगारुंविरुद्ध आठ धावांनी शतक हुकल्यानंतरही रोहितचं नाबाद 'द्विशतक'; ढगाळ वातावरणात पाडला विक्रमांचा 'पाऊस' - rohit sharma
  3. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; विश्वचषक संघातील दोन खेळाडूंना संधी, 'हा' खेळाडू कर्णधार - Team India
Last Updated : Jun 25, 2024, 12:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details