हैदराबाद :संपूर्ण महाराष्ट्रात 'मकर संक्रांत' (Makar Sankranti 2025) हा सण उत्साहात साजरा केला जातो. वर्ष 2025 मध्ये मकर संक्रात 14 जानेवारी, मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळं 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्यानं पुण्य मिळेल? तसंच यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी (Makar Sankranti Color) आणि कोणती साडी नेसू नये जाणून घ्या ईटीव्ही भारतच्या बातमीमधून.
का आहे मकर संक्रांत महत्त्वाची? (Importance): हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडं सरकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते असा समज आहे.
मकर संक्रांत शुभ मुहूर्त (Shubh Muhurat): मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं. पंचांगनुसार यंदा मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9.03 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी 5.46 पर्यंत असेल.