कोल्हापूर Mahesh Potdar Rangoli Service :पाहणाऱ्याला जिवंत वाटाव्यात अशा साकारलेल्या रांगोळी कलाकृती अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराच्या परिसरात लक्ष वेधून घेत आहेत. शरयू नदीचा किनारा आकर्षक रांगोळ्यांनी नटला आहे. कलानगरी असलेल्या कोल्हापूरच्या रांगोळी कलाकार महेश पोतदार यांनी अयोध्या नगरीत साकारलेल्या आकर्षक रांगोळ्यांची भुरळ अवघ्या भारतवासीयांना पडलीय.
रथयात्रा मार्गावर साकारली रांगोळी: गेली 35 वर्ष देशाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला रांगोळी कलाकार महेश पोतदार हजेरी लावतात. जगातील सर्वात मोठी रथयात्रा असलेल्या ओरिसातील भुवनेश्वर पुरी या ठिकाणी गेली 14 वर्ष कोरोना काळ वगळता, रथयात्रा मार्गावर पोतदार यांनी रांगोळी साकारली आहे. याबरोबरच देशभरातील अनेक धार्मिक कार्यक्रमात रांगोळी कलाकार महेश पोतदार आपल्या कलेमुळे देशभर पोहोचले आहेत. त्यांची कला पाहून अयोध्येतील राम मंदिर न्यासाने, राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी त्यांना आमंत्रित केलं आहे.
17 जानेवारीपासून रांगोळी सेवा :अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यासाठी देशभरातील महत्त्वाच्या व्यक्ती हजेरी लावणार आहेत. कलश यात्रा मार्गावर, सीता महल, चारधाम, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महत्त्वाच्या व्यक्ती येणाऱ्या विमानतळ ते राम मंदिर या मार्गावर महेश पोतदार हे कलेचं सादरीकरण करणार आहेत. गेल्या 500 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राम मंदिराचं लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असल्यानं, आयुष्यातील सर्वोच्च क्षण असल्याचं कलाकार महेश चंद्रकांत पोतदार यांनी सांगितलंय. तर 23 जानेवारीपर्यंत पोतदार अयोध्येत रांगोळी सेवा करणार आहेत.
पोतदार पती-पत्नीची विनामूल्य रांगोळी सेवा : 1986 पासून कोल्हापूरच्या गणेशोत्सवात गल्ली-गल्लीमध्ये आपल्या रांगोळ्यांचा आविष्कार दाखवणारे रांगोळी कलाकार महेश पोतदार दरवर्षी रांगोळी काढतात. आता यासोबतच त्यांच्या पत्नी नर्तकी पोतदार यांनीही पतीसोबत रांगोळीची कला आत्मसात केली आहे. अयोध्येत पोतदार दांपत्य आणि त्यांचे सहकारी आपल्या रांगोळी कलानी अयोध्येत येणाऱ्या रामभक्त आणि भारतवासीयांना भुरळ घालत आहेत.
हेही वाचा -
- 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
- प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह अवघा देश सजला; सांगलीच्या तरुणाची अयोध्या नगरीत रांगोळी
- अंध विद्यार्थिनीची अनोखी रामभक्ती, राम गीत गाऊन केली प्रभू श्रीरामाची आराधना