चंद्रपूर Chandrashekhar Bawankule: "उद्धव ठाकरे हे रविवारी नागपुरात आले आणि वाटेल ते बरळून गेले. मात्र, त्यांची अवस्था आता केविलवाणी झाली आहे. त्यांना कोणी विचारायला तयार नाही. मुख्यमंत्री बनण्यासाठी ते हातात कटोरा घेऊन फिरत आहेत. दिल्लीची वारी केली मात्र, त्यातही काही जमले नाही. त्यामुळं नैराश्यतून ते आता काहीही बरळत सुटले आहेत." अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केलीय.
ठाकरे यांनी एकतरी जागेवर निवडून येऊन दाखवावे : उद्धव ठाकरे हे नागपुरात येऊन देवेंद्र फडणवीस यांचं डिपॉसिट जप्त करण्याची भाषा करत आहेत. मात्र, माझं त्यांना खुलं आव्हान आहे. त्यांनी एखाद्या तरी जागेवरून निवडणूक लढून ती जिंकून दाखवावी. जागा कोणती तेही त्यांनीच ठरवावं असं आव्हान बावनकुळे यांनी दिलं.
उद्धव ठाकरेनी स्वीकारलं काँग्रेसचं हिंदुत्व : जामिनावर बाहेर असलेल्या अनिल देशमुख, दीडशे कोटींच्या घोटाळ्यात सहभागी सुनील केदार यांच्यासोबत बसण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार संपला आहे. त्यांनी काँग्रेसचं हिंदुत्व स्वीकारलय असंही बावनकुळे यांनी म्हटलं.
मोदी-शाह यांच्यामुळे 2019 मध्ये शिवसेनेला यश :2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. उद्धव ठाकरे यांनी जेवढ्या सभा घेतल्या नाहीत त्यापेक्षा जास्त सभा त्यांनी घेतल्या. म्हणूनच शिवसेनेच्या इतक्या जागा निवडून येऊ शकल्या. मात्र ठाकरे यांनी बेईमानी केली. त्यांचं नेतृत्व हे कमजोर नेतृत्व होतं आणि म्हणूनच शिवसेनेचे 50 आमदार त्यांना सोडून गेले, असं बावनकुळे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार आल्यास योजना बंद होणार: जर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 'लाडकी बहीण योजना' बंद होणार, असं काँग्रेसचेच नेते म्हणत आहेत. ते महायुतीच्या सर्व योजना बंद करणार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली त्या ठिकाणी काँग्रेसनं केंद्राच्या अनेक योजना बंद केल्या. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मोदी सरकारला श्रेय मिळू नये म्हणून आकसापोटी केंद्र सरकारच्या 15 योजना बंद केल्या.