मुंबई - World Environment Day 2024 :दरवर्षी 5 जून हा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत लोकांना जागरूक करणं खूप महत्त्वाचं आहे. निसर्गाशिवाय मानवी जीवन या पृथ्वी तलावर राहणार नाही. त्यामुळे झाडं, वनस्पती, जंगलं, नद्या, तलाव, पर्वत ,जमीन यांचं महत्त्व समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणाला सौंदर्यवान बनवायचं असले तर झाडं लावणे खूप आवश्यक आहे. जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं केला होता. जागतिक पर्यावरण परिषदेत चर्चा झाल्यानंतर, 5 जून 1974 रोजी पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाची एक खास थीम असते. गेल्या वर्षी ही थीम प्लास्टिक प्रदूषण उपायांवर आधारित होती.
जागतिक पर्यावरण दिनाची थीम :दरम्यान यावर्षी जागतिक पर्यावरण दिन 2024 ची थीम आहे 'आमची जमीन, आमचे भविष्य.' या अंतर्गत जमीन पुनर्संचयित करणं, वाळवंटीकरण आणि दुष्काळ या गोष्टींवर भर दिल्या जाणार आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध शाळांमध्ये मुलांना पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक करण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलं जातात. वृक्षतोड आणि वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. खराब हवेमुळे लोकांचा श्वास कोंडत आहे. दुषित हवामानामुळे शहरातील अनेक लोकांना श्वसन, हृदय आणि फुफ्फुसाचे आजार होत आहेत. दिवसेंदिवस ग्लोबल वार्मिंग वाढत आहे. मानवी जीवन फक्त पृथ्वीवरच शक्य आहे, म्हणून ते राहण्यायोग्य ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.