हैदराबाद Fenugreek Seed Water Benefits :जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण चटकदार पदार्थांना नेहमी पहिली पसंती देतो. मात्र, ऋचकर वाटणारे हे पदार्थ पोटातील अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. काही पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. मात्र, त्यांच्या चवीमुळे ते घेणे आपण टाळतो. निसर्गात आढळणारं अशीच एक वनस्पती आहे जी चवीने आपल्या जिभेची शत्रु असली तरी शरीरासाठी फारच उपयुक्त आहे. ती म्हणजे आपल्या घरात सहज आढळणारी मेथी.
मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवल्यानंतर मिळणाऱ्या पाण्यामध्ये अत्यंत उपयोगी घटक असतात. यामध्ये जीवनसत्वे, खनिजे, व्हिटॅमीन्स, आयर्न, मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे आपली पचनसंस्था निरोगी आणि वजन नियंत्रणात राहाते. याशिवाय मधुमेहासारख्या आजारापासून देखील आपणास दूर ठेवते. रोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यास तुम्ही अनेक रोगांपासून दूर राहू शकता. चला तर जाणून घेऊया मेथीच्या दाण्याचं पाणी पिण्याचे जादुई फायदे.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर: शरीरातील फॅट बर्न करण्यासाठी मेथीचं पाणी उपयुक्त आहे. शिवाय यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असतं. दररोज उपाशी पोटी मेथीच्या दाण्यांचं पाणी प्यायल्यास वजन नियंत्रणात राहातं. तसंच भुकेवर नियंत्रण ठेवता येतं. यामुळे सतत भूक लागत नाही. नियमित सेवन केल्यास पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते.
त्वचा निरोगी :मेथीचं पाणी प्यायल्यानं स्किनची ऍलर्जी कमी होते. पिंपल्स, डाग यासारख्या समस्या सहज दूर होतात. मेथीचं पाणी त्वचा डिटॉक्स करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात आणि तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसू लागतो.
मधुमेह : नॅशनल लायब्ररी ऑफ काँग्रेसने प्रकाशित केलेल्या जर्नल ऑफ डायबिटीज अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर्समधील अभ्यासानं असं सिद्धं केलं आहे की, मेथीचं पाणी रोज प्यायल्यास टाइप २ मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो.