मुंबई :दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात त्याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरोधात जारी करण्यात आलेल्या लुकआउट परिपत्रकावरील मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. सीबीआय आणि महाराष्ट्र राज्यानं रिया आणि तिच्या कुटुंबावर लुकआउट परिपत्रक जारी केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौक चक्रवर्ती आणि वडील लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांच्याविरुद्ध जारी केलेले लुकआउट परिपत्रक फेटाळलं होतं.
रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून मिळाला दिलासा : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला फटकारताना मोठी टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी म्हटलं, "एका उच्चभ्रू व्यक्तीचाही आरोपींच्या यादीत समावेश असल्यानं तुम्ही ही याचिका दाखल करत आहात, याची तुम्हाला नक्कीच किंमत मोजावी लागेल, त्यांची मुळे समाजात खोलवर रुजलेली आहेत, सीबीआयची इच्छा असेल तर ती काही तर्कानं युक्तिवाद करू शकतात." न्यायमूर्ती के.व्ही.विश्वनाथन यांनी या प्रकरणांमध्येही सीबीआयचं लुकआउट परिपत्रक जारी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध जारी केलेले लुकआउट परिपत्रक रद्द केलं. याप्रकरणी सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.