मुंबई- MNS aggressive against Pakistani artists : अनेक संगीत प्रेमींचा आवडता गायक आतिफ असलम पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आगामी 'लव स्टोरी ऑफ 90' या चित्रपटात अर्जित सिंग सोबत अतिफ असलम देखील गाणं म्हणणार असल्याची माहिती आहे. त्यातच भारतात पाकिस्तानी कलाकारांना मागची काही वर्ष घोषित बंदी असताना आतिफ असलम पुन्हा एकदा पदार्पणा करणार असल्याची माहिती मिळताच त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अर्जित सिंग यांना थेट आव्हान दिलं आहे.
यासदर्भात अमेय खोपकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात की, "अतिफ असलम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलिवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय."
गायक आतिफ असलमने गायलेली अनेक गाणी आजही प्रसिद्ध आहेत. यातील 'ताजदार ए हरम' हे सुफी संगीतावर आधारित गाणं किंवा 'मीठे घाट का पानी' अशी अनेक गाणी आजही आपल्या देशात आवडीने ऐकली जातात. सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटात अतिफ असलमने गायलेले गाणं हे शेवटचं ठरलं. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये प्रचंड तणाव वाढले आणि पाकिस्तानी कलाकारांवर एक प्रकारची अघोषित बंदी घालण्यात आली. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढाकार होता. मात्र, आता तब्बल सात वर्षानंतर आतिफ असलम पुन्हा एकदा बॉलीवूड चित्रपटात गाणं गाणार असल्याने मनसेकडून त्याचा विरोध करण्यात आला आहे.