मुंबई - दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्या 'ये जवानी है दिवानी' चित्रपटाचं शूटिंग मनालीत होणार होतं. या शूटिंगसाठी दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, कल्की कोचलिन, आदित्य रॉय कपूरइतर कलाकार यांना हजर राहायचं होतं. हे सर्व कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्यामुळं अयान मुखर्जीनं एक युक्ती केली आणि सर्वांच्या प्रवासासाठी दोन कारची व्यवस्था केली. अशा प्रकारे सर्व कलाकार कारमधून मनालीला पोहोचले. पण यासर्व कलाकारांना विमानानं पाठवणं अयानला स्वस्त आणि सोपं पडणारं असतानाही त्यानं कारमधून पाठवण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा कल्की कोचलिननं केला आहे.
२०१३ मध्ये गाजलेल्या ब्लॉकबस्टर 'ये जवानी है दिवानी' चित्रपटात अदितीची भूमिका साकारणारी कल्की कोचलिननं चित्रपटातील मुख्य कलाकारांमधील दरी मिटविण्यासाठी मनालीला रोड ट्रिप आयोजित करण्याच्या अयान मुखर्जीच्या प्रतिभावान युक्तीची आठवण करून दिली.
"अयान मुखर्जीने एक गोष्ट केली कारण चित्रपटापूर्वी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. आम्हाला वाचनासाठी जास्त वेळ मिळत नव्हता. आमचं शूटिंगचं पहिलं ठिकाण मनाली होतं. म्हणून त्यानं दिल्ली ते मनाली रोड ट्रिप करण्याचा निर्णय घेतला. त्यानं आम्हाला विमानाने जाऊ दिले नाही. त्यानं दोन कारची व्यवस्था केली आणि एका कारमध्ये रणबीर, दीपिका, मी आणि आदित्य होतो. तो आणि इतर लोक दुसऱ्या कारमध्ये होतो. आम्ही मनालीला रोड ट्रिप केली आणि अशा प्रकारे आम्ही एकमेकांना ओळखू लागलो."
कल्की कोचलिनला असा विश्वास वाटतो की, रोड ट्रिपमुळे खूप फरक पडला आणि कलाकारांमध्ये चांगले बंध निर्माण झाले. धाब्यावर थांबणं, एकत्र जेवणं, लहान गावांमध्ये बाथरूम वापरणं, आमच्या आयुष्याबद्दल बोलणं, असं आम्ही सर्व काही केलं. जर तुम्ही बिझनेस क्लासमध्ये एक तासाची फ्लाइट घेतली आणि पोहोचलात तर ते खूप वेगळं आहे. परंतु, कारमधील ८ तास खूप फरक पाडणारे होते. अयाननं केलेली ही एक अतिशय हुशारीची चाल होती," असं कल्की पुढं म्हणाली.