मुंबई Arun Govil News : भाजपानं पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा मतदारसंघासाठी 'रामायण' या टीव्ही मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे. मेरठमध्ये 'बाहेरचा नेता नको' म्हणून त्यांच्यावर आधीच टीका झाली होती. असं असतानाच ते मतदान संपताच मेरठ सोडून मुंबईत परतल्यानं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, मुंबईत का परतावं लागलं? हे अभिनेता गोविल यांनी आता स्पष्ट केलंय.
एक्सवर पोस्ट करत सांगितलं कारण :शुक्रवारी (26 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, त्याच्या दुसऱ्यादिवशीच अरुण गोविल हे मुंबईला परतले. त्यानंतर या मुद्द्यावरुन विरोधकांनी गोविल यांच्यावर निशाणा साधत टीका करायला सुरुवात केली. विरोधकांच्या टीकेनंतर आता पक्षाच्या आदेशानुसार मी मेरठहून मुंबईत परतल्याचं गोविल यांनी स्पष्ट केलंय. यासंदर्भात अरुण गोविल एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की , "मेरठच्या माझ्या आदरणीय मतदार, भगिनींनो, बंधू आणि कार्यकर्त्यांनो...नमस्कार. होळीच्या दिवशी म्हणजेच 24 मार्चला भारतीय जनता पक्षानं माझ्या नावाची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार मी 26 मार्चला तुमच्याकडं पोहोचलो. 1 महिना तुमच्या सोबत राहून तुमच्या पाठिंब्यानं प्रचार केला. तुमच्या प्रेम, समर्थन आणि आदराबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आता पक्षाच्या सूचनेनुसार मी माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी मुंबईत आलो आहे."