मुंबई - Masaba announces pregnancy : वेस्ट इंडिजचा आक्रमक माजी क्रिकेटपटू विव्हियन रिचर्ड्सची मुलगी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता पहिल्या मुलाची आई होणार आहे. मसाबा आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा यांच्या घरी पाळण्याची तयारी सुरू झाली आहे. या जोडप्यानं गुरुवारी इंस्टाग्रामवर संयुक्त पोस्टमध्ये ही बातमी शेअर केली. "दोन छोटी पावलं आमच्या दिशेने येत आहेत. कृपया त्याच्यासाठी प्रेम, आशीर्वाद आणि केळ्यांचे चीप्स ( फक्त खारे ) पाठवा. बाळ येत आहे आणि आम्ही आई बाबा होणार आहोत.", अशा एका क्रिएटिव्ह मजकुरासह आकर्षक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. यानंतर मसाबाची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी ही पोस्ट पुन्हा शेअर केली आहे.
आजी होण्यासाठी उत्सुक असलेली ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता हिने आपला आनंद एका पोस्टमधून व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर तिनं हिंदीमध्ये लिहिलंय, "हमारे बच्चों का बच्चा आने वाला है. इससे जादा खुशी की बात क्या हो सकती है."
नीना गुप्ता आणि मसाबाने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सहकलाकार आणि चाहत्यांनी अभिनंदन करायला सुरुवात केली आहे. करीना कपूर खान, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, अनन्या पांडे आणि क्रिती सॅनन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. करीनानं मसाबाला आई होत असल्याबद्दल अभिनंदन केलं आणि सत्यदीप मिश्रालाही सदिच्छा दिल्या. आलिया भट्टनेही हार्ट इमोजीस अभिनंदन केलं.