हैदराबाद - अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित 'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पुष्पा २ च्या प्रीमियर शोदरम्यान हैदराबादमधील थिएटरबाहेर चेंगराचेंगरी झाली. यावेळी उसळलेल्या गर्दीत एक महिला ठार झाली आहे तर तिची दोन मुलं गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
बुधवारी रात्री पुष्पा 2 चं प्रीमियर स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. अल्लू अर्जुन रात्री 10.30 वाजता हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पोहोचला. त्याला एक झलक पाहण्यासाठी गर्दी जमली होती. आरटीसी एक्स रोडवर असलेल्या संध्या थिएटरबाहेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यादरम्यान घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेसह २ ते ३ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
सोशल मीडिया आणि बातम्यांनुसार, दिलसुखनगरमध्ये राहणारी रेवती (39) पती भास्कर, मुलगा आणि लहान मुलांच्या बरोबर पुष्पा 2 पाहण्यासाठी आली होती. रात्री 10.30 च्या सुमारास रेवती आणि तिचे कुटुंबीय चित्रपटगृहातून बाहेर पडत असताना चेंगराचेंगरी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरकडे धाव घेतली आणि बाहेर येणाऱ्या लोकांना या गर्दीनं धक्का दिला.
या चेंगराचेंगरीमध्ये रेवती आणि तिचे कुटुंबीय जखमी झाले. पोलीस कर्मचारी आणि आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ रेवती आणि तिच्या मुलाला गर्दीपासून दूर केले आणि त्यांना सीपीआर दिला. नंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मुलाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दुर्दैवानं या घटनेत रेवतीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गांधी रुग्णालयात नेण्यात आला आहे.