हैदराबाद - रामोजी राव यांनी देशात प्रथमच मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये एकाचवेळी इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांची सुरुवात केली. त्यांनी विविध राज्यांतील प्रेक्षकांसाठी स्थानिक भाषेत भाषा बातम्या आणि मनोजरंज उपलब्ध करून दिली. विविध राज्यांतील पत्रकार आणि कलाकारांना प्रतिभेसाठी नवीन व्यासपीठ मिळालं. प्रेक्षकांना आपल्या भाषेतील मनोजरंजनाची साधने मिळाल्यानं प्रादेशिक भाषांवरील हिंदी आणि इंग्रजी भाषेचा पकडा कमी होण्यास मदत झाली.
रामोजी राव यांनी लोकांच्या हितासाठी एकनिष्ठ राहून 'ईनाडू' या तेलुगू दैनिकातून हजारो पत्रकार घडवले. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते लोकांसाठी समर्पित जीवन जगले. टीव्ही इंडस्ट्रीच्या माध्यमातून हजारो नव्या गुणवंत कलाकारांची रुपेरी पडद्यावर ओळख करून दिली. ईटीव्ही मराठी, ईटीव्ही कन्नड, ईटीव्ही तेलुगु, ईटीव्ही गुजराती अशा प्रादेशिक भाषांतील टीव्हीवरील दर्जेदार कार्यक्रम आणि बातम्यांना प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली. असा चमत्कार घडविण्यामागे रामोजी राव यांनी गुणवत्तेचा घेतलेला ध्यास आणि गुणग्राहकता होती.
ईटीव्ही ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांची मातृसंस्था-रामोजी राव यांनी ऑगस्ट 1995 मध्ये तेलुगू प्रेक्षकांसाठी ईटीव्ही ही वाहिनी लाँच केली. ईटीव्हीनं अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर आपले नेटवर्क वाढवत 13 भाषांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया लाँच केले. ईटीव्ही चॅनेल म्हणजे विश्वसनीय बातम्या आणि दर्जेदार कार्यक्रम अशी संपूर्ण देशभरात ओळख निर्माण झाली. दर तासाला पहिले बुलेटिन, देशामध्ये वाहिनीचे प्रेक्षपण करण्यासाठी असलेले स्वत:चे अर्थ स्टेशन, ब्रेकिंग नव्हे फक्त विश्वसनीयता हे ब्रीद यामुळे ईटीव्ही मराठीसह इतर भाषांमधील ईटीव्ही वाहिन्यांच्या बातम्यांनी नवीन ट्रेंड तयार केले. ईटीव्हीच्या बातम्यांमधून जोपासलेली विश्वसनीयता आणि असंख्य पत्रकारांचे घडलिले करियर यामुळे ईटीव्ही ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांची मातृसंस्था मानली जाते.