महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 27, 2020, 11:35 AM IST

ETV Bharat / state

शेतकऱ्याने 180 किमीचा प्रवास करून गाठले खरेदी केंद्र; मात्र कापूस खरेदीस नकारच

सध्या पेरणीचे दिवस असताना कापूस खरेदी होणार की नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत. नेर तालुक्यातील आडगाव (लाख) येथील ताईबाई साबळे या महिला शेतकर्‍याच्या नावावर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. मात्र, त्यांना कापूस विक्री करण्यास दुसरीकडे जाण्यास सांगितले.

cotton in Wani
शेतकऱ्याने 180 किमी प्रवास करूनही वणीमध्ये कापूस खरेदी करण्यास नकार

यवतमाळ -जिल्हा प्रशासनाने ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायचा आहे, त्यांनी सीसीआय व पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी ठरवून दिलेल्या जिनिंगवर जाण्यास सांगितले. त्यामुळे नेर येथील शेतकऱ्याने 180 किलोमीटरचा प्रवास करून विक्रीसाठी नेलेला कापूस वणी येथील ‘सीसीआय’च्या केंद्रावर नेला. मात्र, तिथे गेल्यावर त्यांचा अर्धाच कापूस खरेदी करण्यात आला तर उरलेला कापूस खरेदी करण्यास नकार दिला.

त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने किसान काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात कापसाच्या गाडीसह जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडक दिली. त्यामुळे कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाच्या संकट काळात कापूस खरेदीचा प्रश्‍न अधिकच गंभीर बनला. शेतातून निघालेला कापूस अजूनही शेतकर्‍यांच्या घरात विक्रीच्या प्रतीक्षेत आहे.

शेतकऱ्याने 180 किमी प्रवास करूनही वणीमध्ये कापूस खरेदी करण्यास नकार


सध्या पेरणीचे दिवस असताना कापूस खरेदी होणार की नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत. नेर तालुक्यातील आडगाव (लाख) येथील ताईबाई साबळे या महिला शेतकर्‍याच्या नावावर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. त्यांना बुधवारी कापूस विक्रीसाठी वणी येथील ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रावर बोलाविण्यात आले. प्रदीप साबळे एका मालवाहू वाहनाने जवळपास 17 क्विंटल कापूस केंद्रावर घेऊन गेले. 6 क्विंटल कापूस खरेदी केल्यावर कर्तव्यावरील ग्रेडरने माल खराब असल्याचे कारण सांगून परत जाण्याचा सल्ला दिला. शेतकरी प्रदीप साबळे यांनी ज्या भावात होते, त्या भावात कापूस खरेदी करा, वाहनाचे भाडे आणि कापूस नेणे परवडणार नाही, अशी विनवणी केली.

ग्रेडकरकडून करण्यात आलेल्या पैशांची मागणी पूर्ण करण्यात न आल्याने अखेर कापसाच्या गाडीसह साबळे यांनी यवतमाळात येऊन जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. नेर ते वणी प्रवास खर्च सात हजार रुपये आणि रात्रीचे अतिरिक्त भाडे, असा अतिरिक्त खर्चाचा भार शेतकर्‍याच्या खिशावर पडला. कापूस खरेदी न केल्यास ही गाडी कार्यालय परिसरातच खाली करण्यात येईल, असा इशारा किसान काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी दिला.

जिल्हा उपनिबंधक रमेश कटके अमरावतीला कार्यालयीन कामानिमित्त गेले असल्याने प्रभारी म्हणून आर. ए. गर्जुर यांनी शेतकर्‍यांसोबत चर्चा केली. रिजनल मॅनेजर गोस्वामी यांनी कापूस खरेदी करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यावर कापसाची गाडी यवतमाळ येथील बाजार समितीत नेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र हेंडवे, प्रदीप डंभारे, घनश्याम अत्रे, अरुण ठाकूर, जितेश नवाडे, चंदू नंदेश्‍वर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details