ठाणे CM Eknath Shinde :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहीम अभियानांतर्गत देशाला स्वच्छतेची सवय लावली. त्याचवेळी महाराष्ट्र सरकारनं देखील स्वच्छता मोहीम सुरू केलीय. त्यामुळं राज्याला स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक मिळाला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. त्यांनी आज ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरात स्वच्छता मोहीमेची सुरवात केलीय. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रदूषणाला आळा :महाराष्ट्रातील प्रदूषणानं गेल्या काही महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. वाढत्या प्रदूषणामुळं नागरिकांना श्वसनाचं विकार होऊन परिस्थिती गंभीर बनलीय. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळं प्रदूषणाला आळा बसण्यास मदत झाल्याचं शिंदे यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेची सुरवात : त्याचवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रला प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळं महाराष्ट्रात डीप क्लीन ड्राइव्हची घोषणा केली. आज या अभियानाचा शुभारंभ कौपिनेश्वर मंदिरापासून सुरू करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे कौपिनेश्वरांची पूजा करून महाआरती केली. स्वच्छता मोहिमेमुळं देशातील नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व कळलं असून त्यामुळं महाराष्ट्रातील प्रदूषणाची पातळी 300 वरून 100 वर आलीय, असं मुख्यमंत्री म्हणाले. ठाण्यातील पुरातन समजल्या जाणाऱ्या किपोनेश्वर मंदिरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त अभिजित बांगरही होते. राज्य सरकार सर्व मंदिरे, शहरातील स्वच्छतेवर भर देत असल्यानं विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शासनानं हाती घेतलेल्या सखोल स्वच्छता अभियानात मुख्यमंत्री अनेक ठिकाणी जाऊन स्वत: स्वच्छता करत आहेत.