महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जय सिद्धेश्वर ठरतील का सोलापूरचे 'योगी'? भाजप राबवू पाहतोय युपी पॅटर्न

जय सिद्धेश्वर स्वामींचा राजकारणाशी आजवर काहीही संबंध नाही. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी धर्म प्रसार करण्यात घालवले आहे. पण, त्यांना उमेदवारी देण्यामागे मतांचे गणीत असल्याचे बोलले जात आहे.

By

Published : Mar 24, 2019, 12:21 PM IST

डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी

सोलापूर - भारतीय जनता पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लिंगायत धर्मगुरू डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत भाजपने देशभरात अनेक अध्यात्मिक धर्मगुरुंना संसदेत पाठवले आहे. उत्तर प्रदेशात तर योगी आदित्यनाथ थेट मुख्यमंत्रीपदी बसले आहेत. सोलापुरात देखील भाजप हाच युपी पॅटर्न राबवत असल्याचे बोलले जात आहे. हा पॅटर्न यशस्वी होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल.

सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना डावलून भाजपने जय सिद्धेश्वर यांना सुशिलकुमार शिंदेंच्या विरोधात उतरवले आहे. त्यामुळे बनसोडे नाराज आहेत. पण, नागरिकात सुद्धा यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जय सिद्धेश्वर स्वामींचा राजकारणाशी आजवर काहीही संबंध नाही. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी धर्म प्रसार करण्यात घालवले आहे. पण, त्यांना उमेदवारी देण्यामागे मतांचे गणीत असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत डॉ. जय सिद्धेश्वर?


जय सिद्धेश्वर स्वामी यांचा जन्म १ जून १९५५ ला रुद्रम्मा आणि गुरुबसय्या हिरेमठ यांच्या घरात झाला. स्वामींना बनारस हिंदू विद्यापीठातून 'वीरशैव एवम काश्मिर शैवदर्शनमे मोक्षका' या विषयावर पीएचडी केली आहे. १९८९ साली त्यांनी गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संस्थेची स्थापना केली. १९९१ मध्ये गौडगाव येथे श्री जगद्गुरुपंचाचार्य प्रशाला सुरू केली. तसेच, अक्कलकोट शहरात बीबीए आणि बीसीए महाविद्यालय आणि यतेश्वर पब्लिक स्कूल, नूतन प्राथमिक मराठी शाळेची स्थापना केली. एका मागासवर्गीय वसतीगृहाची स्थापनाही केली.

सिद्धेश्वर स्वामींना मराठीसह कन्नड, तेलगू, हिंदू या भाषा अवगत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे. याचा फायदा भाजपला निवडणुकीत होऊ शकतो. सामाजिक कामातूनही स्वामी लोकांच्या संपर्कात असतात. माशाळ व गौडगाव येथील संस्कृती केंद्रे, शेळगी येथील शिवयोगीधाम, हिरेमठ संस्थान यांच्या मार्फत स्वामींचे सामाजिक काम चालते.

ABOUT THE AUTHOR

...view details