महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 18, 2020, 11:48 AM IST

ETV Bharat / state

जिल्हा रुग्णालयात सुसज्ज 'आयसीयू' उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवा; पालकमंत्री उदय सामंत यांची सूचना

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा आता सुरू होत आहे. याला नागरिकांनी पहिल्या टप्प्याप्रमाणे सहकार्य करावे. सध्याची परिस्थिती पाहता आपण लवकरच शून्यावर पोहचू, असा विश्वासही पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग - जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नव्याने सुसज्ज असा अतिदक्षता विभाग उभारावा तसेच कुडाळ येथील महिला रुग्णालयामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारावे यासाठीचे प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर तयार करून पाठवावेत, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री सामंत यांनी कोविड-१९ चा जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, आरोग्य अधिकारी कांबळे, तहसीलदार अमोल पाठक आदी उपस्थित होते.

हेही वाचा -शरद पवार यांचा आत्मचरित्रात एक आणि अंमलबजावणीत दुसरा चेहरा; भाजपाचा आरोप

सध्याच्या कोविड काळातील आरोग्य यंत्रणा सुधारणासाठीच्या संधीत रूपांतर करावे, असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, जिल्हृयातील सध्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्हीटी रेट हा 0.03 टक्के आहे. त्यामुळे लोकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. पण नागरिकांनी अजूनही खबरदारी घेणे गरजेचे आहे. जे स्थानिक व्यापारी, नागरिक आणि स्थानिक प्रशासन जनता कर्फ्यू करणार आहेत. त्यांचे स्वागत आहे. त्याला प्रशासनाने सर्व सहकार्य करावे. जिल्हा प्रशासन आता लॉकडाऊन करणार नाही, पण जनता कर्फ्यू करण्यास आमचे सहकार्य राहील. जिल्ह्यातील मृत्यू दर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अजून प्रयत्न करावेत.

हेही वाचा -सिंधुदुर्गात गावठी हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा, दारूचा मोठा साठा जप्त

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा आता सुरू होत आहे. याला नागरिकांनी पहिल्या टप्प्याप्रमाणे सहकार्य करावे. सध्याची परिस्थिती पाहता आपण लवकरच शून्यावर पोहचू असा विश्वासही पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, उपचार, रुग्णसंख्या पॉझिटिव्ह रेट, मृत्यूदर, खासगी कोविड सेंटर, माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हृयातील आतापर्यंतच्या मृत्यूची कारणे व त्याचे विश्लेषण करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली. या समितीमध्ये शासकीय अधिकारी, डॉक्टर्स यांसह खासगी डॉक्टरांचा समावेश आहे. सध्या ही समिती कोविडमुळे झालेल्या मृत्यूचे ऑडिट करत असल्याचेही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details