महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 22, 2021, 7:33 PM IST

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात नद्यांना पूर, शेती क्षेत्रात घुसले पाणी, घराचे नुकसान

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या नाल्यांना पूर आल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक घरांची पडझड झाली असून अनेक घरांची छप्परे उडाली आहेत. देवगड, कुडाळ, कणकवली या तालुक्यात शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.

Traffic jam on Sindhudurg-Kolhapur route
सिंधुदुर्गात नद्यांना पूर

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. देवगड तालुक्यात अति वृष्टीमुळे एक घर कोसळले आहे. तर कुडाळमधील भंगसाळ नदीला पूर आल्यामुळे पावशी गावातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. तर पाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

देवगड तालुक्यात घरांचे नुकसान

देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोर्ले गावात घरावर घर कोसळून सुमारे ६ लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील माणसे या दुर्घटनेत बालंबाल वाचली. तर नाद गावामध्येही तीन घरांचे छप्पर उडाले. नाद गावातील भिकाजी पांगम यांच्या घरावरचे पत्रे उडाले तर श्रीकांत पोयरेकर व शांताराम बंडवे यांच्या घरावरची कौले उडाली. तर कोर्ले बाणेवाडी येथील शांताराम सोनू बाणे यांच्या मातीच्या घराची भिंत खाली घर असलेल्या प्रकाश धकटू बाणे यांच्या घरावर कोसळली. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्गात नद्यांना पूर

सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

गगनबावडा घाट मार्ग कोकण व घाटमाथा यांना जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर करूळ घाट आहे. परंतु तो घाट खचल्याने या मार्गावरील वाहतूक गेली दहा दिवस बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली होती. त्यातच गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीत गगनबावडा तालुक्यातील मांडुकली व खोकुर्ले गावात मार्गावर पाणी भरल्याने हा मार्ग बंद झाला आहे.

कुडाळमधील भांगसाळ नदीला पूर

कुडाळमधून वाहणाऱ्या भंगसाळ नदीला पूर आला आहे. यामुळे पावशी गावातील शेकडो एकर शेती क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. कुडाळमध्ये देखील किनारी भागात पाणी शिरले आहे. कुडाळ तालुक्यातील पीठढवळ नदीलाही पूर आला आहे. या दोन्ही नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक भागात या नद्यांचे पाणी पात्राबाहेर आलेले आहे. त्यामुळे किनारी भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

कणकवली तालुक्यातही पुराचा फटका

कणकवली तालुक्यातही पूर आला आहे. शिवगंगा नदीच्या पुराचे पाणी लोरे येथील पुलावरून वाहत आहे. त्यामुळे फोंडा वैभववाडी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर गडनदीला पूर आल्याने कणकवलीतुन कासरलकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. तालुक्यातील भरणी गावालाही पुराचा फटका बसला आहे. येथील नदीला पूर आल्याने या भागातील शेतीत पाणी घुसले आहे.

हेही वाचा - राज कुंद्राने दिली क्राइम ब्रांचला लाच? फरार आरोपीचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details