महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 2, 2019, 11:18 AM IST

ETV Bharat / state

लोकसभेतील विजयानंतर उद्धव ठाकरे 'एकविरा'चरणी, १८ खासदारांसह घेतले कुलदेवीचे दर्शन

उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व विजयी खासदारांसह ठाकरे कुटुंबियांचे कुलदैवत असलेल्या पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवीचे शनिवारी दर्शन घेतले.

एकविरा देवीच्या दर्शनाला जाताना उद्धव ठाकरे

पुणे-लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व विजयी खासदारांसह पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवीचे शनिवारी दर्शन घेतले. यावेळी मोठ्या जल्लोषात वाजत-गाजत उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेही सोबत होते.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंसह सर्व खासदार आणि ठाकरे कुटूंबीय पायथ्यापासून पायऱ्या चढत ठाकरे कुटुंबियांचे कुलदैवत असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरात गेले. यावेळी सर्वांनी एकविरा देवीची खणा नारळाने ओटी भरून दर्शन घेतले. शिवसेना आणि भाजप युतीला लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाले आहे. निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत.

निवडणुकीच्या काळात मार्च महिन्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब एकविरा देवीच्या दर्शनाला आले होते. तेव्हा, त्यांनी शिवसेना-भाजप युतीला यश मिळू दे, अशी प्रार्थना केली होती. शिवसेनेची पुढील वाटचाल आणि यशाकरीता देखील आशीर्वाद मागायला आलो असल्याचे ठाकरे तेव्हा म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी शनिवारी अठरा खासदारांसह सहकुटुंब दर्शन घेतले. परंतु, त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.

यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, भावना गवळी, धैर्यशील माने, गजानन कीर्तिकर, श्रीरंग बारणे, विनायक राऊत, सदाशिव लोखंडे, अनिल देसाई, राजन विचारे, श्रीकांत शिंदेंसह अठरा खासदारांनी सपत्नीक उपस्थित राहत एकविरा देवीचे दर्शन घेतले आशीर्वाद घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details