महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लेकरासाठी आईचे दुर्गेचं रुप; बिबट्याशी दोन हात करत वाचवला चिमुकल्याचा जीव

बिबट्याने दीड वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला चढवला. त्यावेळी आपल्या चिमुकल्याचे प्राण बिबट्या घेत असल्याचे पाहून आई दीपालीने दुर्गेचे रूप धारण केले. या थरारक घटनेत चिमुकल्याच्या आई आणि वडिलांनी चिमुकल्याला बिबट्याच्या तोंडातून सोडवून घेत, त्याचा जीव वाचवला.

By

Published : Apr 19, 2019, 11:20 PM IST

Updated : Apr 19, 2019, 11:53 PM IST

जखमी चिमुकल्यासह आई

पुणे- आईने पोटच्या पोराचे मरण डोळ्यासमोर पहिले अन् सुरू झाला बिबट्या अन् आई-बापाचा संघर्ष. बिबट्याने दीड वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला चढवला. त्यावेळी आपल्या चिमुकल्याचे प्राण बिबट्या घेत असल्याचे पाहून आई दीपालीने दुर्गेचे रूप धारण केले. या थरारक घटनेत चिमुकल्याच्या आई आणि वडिलांनी चिमुकल्याला बिबट्याच्या तोंडातून सोडवून घेत, त्याचा जीव वाचवला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हा थरार ऐकला, तरी अंगावर काटा येतो. . .

दीपालीसह दिलीप


ऊसतोड कामगार असलेल्या दिपाली आणि दिलीप माळी या दाम्पत्याला दीड वर्षींय ज्ञानेश्वर नावाचा मुलगा आहे. दिवसभर काम करून आल्यानंतर ते उन्हाळा असल्याने शेतात कोपीच्या बाहेर बाळासह झोपले होते. मध्यरात्री अचानक बिबट्याने ज्ञानेश्वरवर हल्ला चढवला. तो रडत असल्याने दिलीप आणि आई दिपाली यांना जाग आली. समोर अत्यंत भीतीदायक दृश्य दिसत होते. आई दिपालीने बाळाचा पाय धरला व तो शेवटपर्यंत सोडला नाही. तर दुसरीकडे बिबट्या बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात वडील दिलीप यांनी बिबट्याच्या तोंडावर हातात मिळेल ती वस्तू मारली आणि आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली.


आई बाळाला मृत्यूच्या दारातून ओढत होती, तर दुसरीकडून बिबट्या चिमुकल्याच्या तोंडाला धरून ओढत होता. या घटनेत दीड वर्षाचा ज्ञानेश्वर जखमी झाला असून त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


जंगलवस्तीत रहाणारा बिबट्या आता ऊसाच्या शेतीलाच जंगल समजून वास्तव्य करू लागला आहे. ऊसतोड मजूरही ऊसतोडणीचे काम करत ऊसाच्या शेताच्या बाजुलाच आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्य करतात. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Last Updated : Apr 19, 2019, 11:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details