पुणे- जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा देणारी विप्रो लिमिटेड कंपनीने शहरात विशेष कोविड-१९ रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ४५० खाटांचे हे रुग्णालय असणार असून कंपनीने यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र शासनासमवेत केला आहे. हे विशेष कोविड-१९ रुग्णालय पुण्याच्या हिंजेवाडी येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशनचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. विप्रोच्या या मानवतावादी योगदानामुळे आपली वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना याचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कराराच्या निमित्ताने म्हटले आहे. हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल.
गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ खाटा उपलब्ध असतील. हे कोविड-१९ साठी समर्पित असलेले स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात २४ उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल. आवश्यक वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहायाने रुग्णालय त्वरित सुरू करण्यासाठी विप्रो प्रशासकासह संरचनेनुसार आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याबरोबरच पायाभूत सुविधा, वैद्यकीय फर्निचर आणि उपकरणे प्रदान करेल.