मुंबई KEM Hospital : मुंबईकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचा दावा करणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग रुग्णांच्या जीवाशी खेळतोय की काय असा प्रश्न विचारला जात आहे. याला कारण ठरलाय केईएम रुग्णालयातील एक गंभीर प्रकार. केईएम रुग्णालयातील एका अधिकाऱ्यानं रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रिपोर्टच्या चक्क पेपर डिश बनवण्यात आल्या आहेत. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुग्णांचे रिपोर्ट बाहेर विकणे ही गंभीर बाब असल्यानं, त्या विरोधात आता माजी महापौर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले आहेत.
प्रकरणाची चौकशी आवश्यक : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली असून, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशपांडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कुठल्या तरी अधिकाऱ्यानं त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी रुग्णांचे मेडिकल रिपोर्ट रद्दीत विकल्याचा आरोप देखील संदीप देशपांडे यांनी केला आहे. या संदर्भात आम्ही संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं, "केईएम रुग्णालयातील एका कुठल्यातरी अधिकाऱ्यानं त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्ट रद्दीत विकले आहेत. आता हे महानगरपालिकेच्या संमतीनं केलं की परस्पर पैसे खाण्यासाठी केलं याची चौकशी होणे आवश्यक आहे."
अशा लोकांना घरी बसवलं पाहिजे : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील तत्काळ केईएम रुग्णालयाला भेट देत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "या पालिकेच्या रुग्णालयांमध्ये असे गंभीर प्रकार घडत असतील तर अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे. ज्या लोकांना स्वतःची जबाबदारी आणि हॉस्पिटलची महती कळत नाही अशा लोकांना घरीच पाठवलं पाहिजे. इथले जे एएमसी आहेत ते जेम्स बॉण्ड प्रमाणे बुरखा घालून येतात लोकांना घाबरवतात. हे चुकीचं आहे. मी देखील एक स्टाफ नर्स होते. त्यामुळं एखादी घाबरलेली परिचारिका रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही." दरम्यान, यासंदर्भात आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका सहआयुक्त सुधाकर शिंदे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. सोबतच आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी दक्षा शहा यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधला असता संपर्क झालेला नाही.
हेही वाचा :