परभणी - पालममध्ये बुधवारी रात्री दंगल उसळली होती. यानंतर गुरुवारी शहर पूर्णपणे बंद होते. मात्र, आज सकाळी हळूहळू सुरळीत होत असणारे शहर खून झाल्याच्या अफवेमुळे पुन्हा एकदा बंद झाले आहे. शहरातील जायकवाडी परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळला असून याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
परभणीतील पालम शहर पुन्हा बंद, खून झाल्याची अफवा
शहरातील जायकवाडी परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळला असून याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
दयानंद नारायण मेकाने (वय-36 वर्ष) असे या मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री जायकवाडी वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याचा मृत्यू झाला आहे. सकाळी काही लोकांना त्याचा मृतदेह दिसल्यानंतर खून झाल्याची अफवा पसरली. दयानंद मेकाने हा तालुक्यातील घोडा या गावचा रहिवाशी आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे अफवा पसरून शहर कडकडीत बंद झाले आहे. शहरात बुधवारी झालेल्या दंग्याचे पडसाद अजूनही कायम आहेत. यामुळे दहशतीखाली असलेल्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने उघडली नाही. त्यातच या घटनेने पुन्हा एकदा शहर दहशतीखाली वावरत आहे.