परभणी - शहरातील मुख्य बाजारपेठेचा भाग असलेल्या गुजरी बाजारात पाडव्यानिमित्त विकल्या जाणाऱ्या साखरेच्या हारांचे दुकान लावण्यावरून सावत्र भावांमध्ये मारहाण झाली. या मारहाणीमध्ये २ सावत्र भावांनी मिळून एका भावाच्या डोक्यात रॉड आणि अंगावर चाकूचे वार करून खून केला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गेल्या ४ दिवसातील परभणीतील ही दुसरी हत्या आहे. यापूर्वी २ मित्रांनी मिळून किरकोळ वादातून शिवसेनेचा नगरसेवक असलेल्या अमरदीप रोडे यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.
शहरातील बाजारपेठेचा भाग असलेल्या गुजरी बाजारात पाडव्यानिमित्त साखरेच्या हारांची विक्री करण्यासाठी दुकाने लावण्यात येतात. हे दुकान लावत असताना सोमनाथ लक्ष्मण आळणे आणि त्यांचे सावत्र बंधू सचिन आणि नितीन (रा. भोई गल्ली, परभणी) यांच्यात वाद झाला. यामध्ये सचिन आणि नितीन यांनी घरून लोखंडी रॉड चाकू आणून सोमनाथ यांच्यावर हल्ला केला. शिवाय त्यांना दगडाने ठेचले. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोमनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय परिसरात आणि घटनास्थळी बघ्यांची देखील गर्दी जमली. काही काळ तणाव निर्माण झाल्याने बाजारपेठ बंद होती. दरम्यान, घटना घडल्यानंतर सचिन आणि नितीन हे दोन दोन्ही भाऊ घटनास्थळावरून फरार झाले. त्यांना नानलपेठ पोलिसांनी अटक केल्याची माहिती ठाणे अंमलदार येवले यांनी दिली आहे.